ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना बुधवारपासूनभारत-ऑस्ट्रेलिया मालिका 1-1 अशा बरोबरीतऑस्ट्रेलियाच्या संघात 7 वर्षीय खेळाडूचा समावेश
मेलबर्न, भारत विरुद्घ ऑस्ट्रेलिया : पर्थ कसोटीत भारताचा पराभव करत कसोटी मालिकेत बरोबरी साधणारा ऑस्ट्रेलियन संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज झाला आहे. 26 डिसेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं संघात सात वर्षांचा फिरकीपटू आर्ची शिलरला स्थान दिले आहे. पण, शिलरला संघाचा सदस्य का बनवलं, त्यामागचं कारणं माहित पडल्यात कागांरूना सलाम करावसं वाटेल.
बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियानं 14 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यामध्ये आर्ची शिलरला 14 वा खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेडवर झाला. त्यावेळी शिलरनं ऑस्ट्रेलियन संघासोबत सराव केला होता. त्यानंतर आता त्याला तिसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. शिलरच्या निवडीला ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेननंदेखील दुजोरा दिला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात निवड झाल्याची माहिती शिलरला यंदाच्या ऑक्टोबरमध्ये देण्यात आली होती. त्यावेळी कांगारुंचा संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळत होता. मला विराट कोहलीला बाद करायचं आहे, अशी इच्छा त्यावेळी शिलरनं ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्याकडे बोलून दाखवली होती. मला राष्ट्रीय संघाचा कर्णधार व्हायचं आहे, असा मानस शिलरनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाशी संवाद साधताना व्यक्त केला.
तीन महिन्यांचा असताना शिलरला हृदयाचा एक गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. तीन महिन्यांच्या असल्यापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 22 डिसेंबरला त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्याने विराट कोहलीला बाद करण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणून ऑस्ट्रेलियन संघाने त्याचा संघात समावेश केला.