Join us  

IND vs AUS 3rd Test : सलामी जोडीचा शोध संपलाय?

हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल यांनी ज्या पद्धतीने खेळ केला त्यावरून सलामी जोडीची चिंता थोडीशी दूर झाल्यासारखे वाटते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 5:33 AM

Open in App

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)कसोटी संघाच्या सलामी जोडीसाठी आतापर्यंत बऱ्याच जणांना संधी देण्यात आली होती. हा शोध संपलेला नव्हता. आजच्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल यांनी ज्या पद्धतीने खेळ केला त्यावरून सलामी जोडीची चिंता थोडीशी दूर झाल्यासारखे वाटते. हनुमाने संथगतीने फलंदाजी केली. त्याने २९ व्या षटकापर्यंत आपला संयम कायम ठेवला. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत २९ व्या षटकापर्यंत सलामीवीर टिकले नाहीत. आज मात्र चित्र बदलले.हनुमाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले तरी त्याच्यात नवीन चेंडू योग्य प्रकारे खेळण्याची शैली दिसून आली. असे असले तरी हीच जोडी आपल्याला पुढील सामन्यातही सलामीला दिसेलच, असेही सांगता येत नाही. आज जर पृथ्वी शॉ पूर्णत: तंदुरुस्त असता तर हनुमाला संधी मिळाली नसती. तसे पाहिल्यास हनुमा आणि मयांक यांना नवोदित खेळाडू म्हणता येणार नाही. दोघेही २६, २७ वर्षांचे आहेत. दोघांकडेही अनुभव आहे. ते पाच-सहा वर्षे सातत्याने स्थानिक पातळीवर खेळत आहेत. तसेच इंडिया ‘ए’ संघाचेही त्यांनी अनेकवेळा प्रतिनिधित्व केले आहे.आजच्या दिवसाचे प्रमुख आकर्षण ठरले, ते मयांक अग्रवालच्या ७६ धावा. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मयांक या संधीच्या प्रतीक्षेत होता. अखेर मोक्याच्या क्षणी त्याला ही संधी मिळाली. कारण अनेक नवे चेहरे कसोटी संघात स्थान मिळावे, यासाठी झटत आहेत. पृथ्वी शॉ, शुभमन गील असे अनेक नवोदित खेळाडू सातत्याने स्थानिकपातळीवर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आहेत. त्यांना जर ही संधी मिळाली असती, तर मात्र मयांकला पुन्हा संघात स्थान मिळवणे कठीण झाले असते. मयांकनेही मिळालेल्या संधीचे खºया अर्थाने सोने केले. त्याने नैसर्गिक खेळ केला.कर्णधार कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांचीही भागीदारी महत्त्वाची ठरली. चेतेश्वर पुजारा नेहमीप्रमाणे आपली शिटअँकरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे इतर खेळाडूंनाही धावा करणे सोपे होते. या मालिकेत त्याने सिद्ध करून दाखवले, मीसुद्धा भारतासाठी सातत्याने धावा करू शकतो. सुरुवातीला गडी बाद न झाल्यामुळे विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर जास्त दडपण आले नाही. त्यामुळेच आपण दिवसअखेर २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारू शकलो. फलंदाजी संथ झाली असली तरी आपल्याकडे ८ फलंदाज शिल्लक आहेत. ही जमेची बाजू म्हणावी लागेल. आजच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात मिचेल स्टार्क आणि हेजलवूड यांना चांगला स्विंग मिळत होता, यावरून खेळपट्टी आपला रंग बदलत तर नाही, असे वाटत आहे.आॅस्ट्रेलियाकडून आदर्शसात वर्षीय कॅन्सरग्रस्त आर्चि शिलर या बालकाला राष्ट्रीयसंघात स्थान देऊन आॅस्ट्रेलियन क्रिकेट व्यवस्थापनाने एक नवा आदर्श घालून दिला आहे. आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड नेहमी क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी पुढे असतो. ते अनेक प्रकारे प्रेक्षकांना क्रिकेटशी जोडण्याचा प्रयत्न करीत असतात. ‘मेक अ विश कॅम्पेन’तर्फे कॅन्सर पीडितांनाही क्रिकेटशी जोडण्यासाठी केलेला हा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ