Join us  

IND vs AUS 3rd Test: Ravindra Jadejaची काढली विकेट, Nathan Lyon ने मोडला दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचा मोठा विक्रम

पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजी गडगडली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 12:41 PM

Open in App

IND vs AUS 3rd Test: पहिल्या दोन कसोटी सामन्यात दणकून पराभव झाल्यानंतर तिसऱ्या कसोटीत मात्र ऑस्ट्रेलियाने (Australia) तगडा कमबॅक केला. स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवत लंच ब्रेकपर्यंत भारताचे (Team India) ८४ धावांत सात गडी माघारी धाडले. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, केएस भरत आणि रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) हे सारे आघाडीचे फलंदाज धडाधड तंबूत परतले. याच दरम्यान, रविंद्र जाडेजाची विकेट घेत, ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने (Nathan Lyon) एक मोठा पराक्रम आपल्या नावे केला.

इंदूर कसोटीत भारतीय संघाची खराब स्थिती असताना ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनने असे काही केले आहे, ज्यामुळे तो संपूर्ण आशियामध्ये प्रसिद्ध झाला. त्याने दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचा विक्रम मोडला. नॅथन लायनने जे काही केले आहे, त्यासाठी रवींद्र जाडेजाची विकेट महत्त्वाची ठरली. जाडेजाच्या विकेटसह लायन हा आशियातील सर्वाधिक बळी घेणारा विदेशी गोलंदाज बनला. नॅथन लायनने शेन वॉर्नचा आशिया खंडात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम १२७ बळींसह शेन वॉर्नच्या नावावर होता. मात्र आता जाडेजाची विकेट ही लायनची आशियातील १२८वी विकेट ठरली आणि त्याने मोठा पराक्रम केला.

याआधी पुजाराची विकेट घेत नॅथन लायनने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनची बरोबरी केली. दोन्ही गोलंदाजांनी पुजाराला आतापर्यंत १२-१२ वेळा बाद केले आहे. तसेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक म्हणून नॅथन लायनचा लौकिक आहे. या मालिकेतील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या अव्वल ५ गोलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते.

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या सत्राबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय फसला. सहाव्या षटकांतच रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल २१ धावा काढून माघारी परतला. चेतेश्वर पुजाराही १ धावा काढून त्रिफळाचीत झाला. मग लायनने ११व्या षटकात जाडेजाला झेलबाद केले. कुहनेमनने जाडेजाचा अफलातून झेल घेतला. श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला. पाठोपाठ विराट कोहली २२ धावांवर बाद झाला आणि केएस भरत १७ धावा काढून पायचीत झाला. त्यामुळे लंचपर्यंत भारताची अवस्था ७ बाद ८४ झाली. आता फिरकीला पोषक खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची किती तारांबळ उडते त्याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजाशेन वॉर्नचेतेश्वर पुजारा
Open in App