मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघ चौथ्या दिवशीच विजय मिळवेल असे वाटत होते. त्यासाठी भारतीय संघाला अर्ध्या तासाचा अतिरिक्त वेळही खेळण्यास दिला, परंतु ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने भारताचा विजय पाचव्या दिवसावर लांबवला. 399 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 135 धावांवर माघारी परतला होता आणि खेळपट्टीची गोलंदाजांना मिळत असलेली साथ पाहता उर्वरित फलंदाज झटपट बाद होतील अशी शक्यता होता. पण, भारताला ऐतिहासिक विजयासाठी एक रात्र वाट पाहावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेर 8 बाद 258 धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी 141 धावा हव्या आहेत. तिसऱ्या दिवसाच्या 5 बाद 54 धावसंख्येवरून सुरुवात करणाऱ्या भारताने 8 बाद 106 धावांवर दुसरा डाव घोषित केला. कमिन्सने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. 399 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला पेलवणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले होते. मात्र कमिन्सने भारताच्या विजयात व्यत्यय आणला. त्याने फलंदाजीतही करिष्मा दाखवला.
त्याने कारकिर्दीत दुसऱ्यांदा एकाच सामन्यात नऊ विकेट आणि अर्धशतकी खेळी केली आहे. याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अशी कामगिरी केली होती. कॅलेंडर वर्षात दोन वेळा अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा तिसरा खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम ह्युज ट्रम्बल ( 1902) आणि ब्रेट ली ( 2008) यांनी केला आहे.
![]()