मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. चेतेश्वर पुजाराचे खणखणीत शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या 82 धावांच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवशी तीनशे धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर उप कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या धावांचा वेग कायम राखला, परंतु या दोघांची 62 धावांची भागीदारी नॅथन लियॉनने संपुष्टात आणली. लियॉनने रहाणेला पायचीत करत ही जोडी तोडली. लियॉनने या विकेटसह एक वेगळा विक्रम नावावर केला.
चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. पुजाराने कारकिर्दीतील 17 वे कसोटी शतकं पूर्ण करताना अनेक विक्रम मोडले. पुजारा व कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी केली. ही जोडी मिचेल स्टार्कने संपुष्टात आणली. स्टार्कने कोहलीला बाद केले. कोहली 82 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहाणे व शर्मा या मुंबईकरांनी भारताची धावसंख्या वाढवली.
रहाणे 149 व्या षटकात पायचीत झाला. लियॉनने सर्वाधिक 9 वेळा रहाणेला बाद केले. या सामन्यापूर्वी पुजारा आणि रहाणे यांना प्रत्येकी 8 वेळा लियॉनने बाद केले आहे. त्यात रहाणेने आघाडी घेतली.