ठळक मुद्देमयांक अग्रवालने मिळालेल्या संधीचं सोनं केलेपहिल्या डावात 76, तर दुसऱ्या डावात 42 धावाभारताने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : लोकेश राहुल आणि मुरली विजय या सलामीवीरांना 8 डावांत मिळून 96 धावा करता आल्या. त्यांना पर्याय म्हणून मेलबर्न कसोटीत भारताने मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी ही नवी जोडी मैदानावर उतरवली. विहारी धावा करण्यात अपयशी ठरला असला तरी त्याची चिकाटी कौतुकास्पद होती. दुसरीकडे मयांकने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्याने दोन डावांत 76 व 42 धावा केल्या आणि भारताला सलामीला नवा पर्याय दिला. पण मयांकला एका विक्रमाने हुलकावणी दिली.
भारतीय संघाने कालच्या 5 बाद 54 धावसंख्येवरुन चौथ्या दिवसाची सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राप्रमाणे भारतीय फलंदाज अपयशी ठरतील असे वाटले होते. मात्र
मयांक अग्रवाल आणि रिषभ पंत यांनी खेळपट्टीवर तग धरला. त्यांनी सहव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. मयांक 42 आणि पंत 33 धावांवर माघारी फिरला. कर्णधार कोहलीने 8 बाद 106 धावांवर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले.
मयांकने 102 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार खेचून 42 धावा केल्या. पॅट कमिन्सने त्याला त्रिफळाचीत केले आणि अवघ्या 8 धावांनी मयांकचा विक्रम हुकला. कसोटी पदार्पणात दोन्ही डावांत अर्धशतक झळकावण्याचा. हा विक्रम आतापर्यंत केवळ दोनच भारतीय फलंदाजांना करता आला आहे. दिलवार हुसेन ( 1934) आणि सुनील गावस्कर ( 1971) यांनी कसोटी पदार्पणात दोन्ही डावांत अर्धशतक केले होते.