ठळक मुद्देबॉक्सिंग डे कसोटीत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो जसप्रीत बुमरा... दोन्ही डावांत मिळून त्याने टिपल्या 9 विकेट्स2008नंतर मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिलाच जलदगती गोलंदाज
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो जसप्रीत बुमरा... त्याने दोन्ही डावांत मिळून 9 ( 6/33 व 3/53) विकेट् घेतल्या. त्याच्या भेदक माऱ्यामुळे भारताने 137 धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चाखवली आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारताने 41 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला. बुमराला उल्लेखनीय कामगिरीमुळे मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. ऑस्ट्रेलियात एका कसोटीत नऊ विकेट्स घेणारा बुमरा हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. त्याने महान कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला.
पाचव्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेल्याने भारतीय निराश झाले, परंतु पाऊस थांबला, खेळ सुरू झाला आणि अवघ्या काही मिनिटांतच भारताने कांगारूंचा डाव गुंडाळला. खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेल्या पॅट कमिन्सला ( 63) बुमराने माघारी पाठवले. त्यापाठोपाठ इशांत शर्माने नॅथन लियॉनचा ( 7) अडथळा दूर करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नऊ विकेट घेणाऱ्या बुमराला मॅन ऑफ दी मॅच घोषित करण्यात आले. 2008 नंतर ऑस्ट्रेलियात हा पुरस्कार पटकावणारा तो पहिलाच भारतीय जलदगती गोलंदाज ठरला आहे. 2008 मध्ये इरफान पठाणने हा पुरस्कार जिंकला होता.
भारताने 41 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच मेलबर्नवरील भारताचा हा ( 1978 व 1981) तिसरा विजय ठरला. मेलबर्नवर 18 वर्षांनंतर भारतीय खेळाडूने मॅन ऑफ दी पुरस्कार जिंकला. 1999 मध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकरने मेलबर्नवर हा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर 18 वर्षांनी आज बुमराने हा पराक्रम केला.
चौथ्या दिवशी बुमराने दोन विकेट घेत कपिल देव व अजित आगरकर यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली होती. देव यांनी 1985 व 1992 साली अॅडलेड कसोटीत अनुक्रमे 8/109 आणि 8/163 अशा कामगिरीची नोंद केली होती. त्यानंतर आगरकरने 2003 मध्ये अॅडलेड येथेच 8/160 अशी कामगिरी केली. बुमराने कारकिर्दीत प्रथमच आठ विकेट घेण्याचा पराक्रम केला. या कामगिरीसह तो मेलबर्न कसोटी सर्वोत्तम कामगिरी करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. त्याने 1985 साली रवी शास्त्री यांनी दोन्ही डावातं मिळून 179 धावांत 8 बळी ( 4/87 व 4/92) टिपले होते. बुमराने शनिवारी दोन विकेट घेत शास्त्रींना मागे टाकले.
रविवारी त्यात आणखी एका विकेटची भर त्याने घातली, परंतु त्याला दहावी विकेट घेता आली नाही. मात्र, त्याने ऑस्ट्रेलियात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जलदगती गोलंदाजाचा मान पटकावत कपिल देव यांना मागे टाकले. कपिल देव यांनी 1985 साली एका कसोटीत 109 धावा देत 8 विकेट घेतल्या होत्या. पण बुमराने हा विक्रम मोडला आणि त्याने 86 धावा देत 9 बळी टिपले. मेलबर्नवर बीएस चंद्रशेखर यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी 1977 साली 104 धावांत 12 बळी ( 6/52 व 6/52) टिपले होते.