ठळक मुद्देमयांक अग्रवालने पहिला दिवस गाजवला76 धावांच्या खेळीसह 71 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलाचेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांची उल्लेखनीय खेळी
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : लोकेश राहुल आणि मुरली विजय या सलामीवीरांच्या अपयशामुळे भारताच्या अन्य फलंदाजांवर येणारे दडपण तिसऱ्या कसोटीत जाणवले नाही. राहुल व विजय या अपयशी जोडीला बाकावर बसवून बॉक्सिंग डे कसोटीत मयांक अग्रवाल व हनुमा विहारी या नव्या जोडीला संधी देण्यात आली. या जोडीने चिवट खेळ करताना भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यांच्या मजबूत पायाभरणीवर अन्य फलंदाजांनी दर्जेदार खेळी करत भारताला पहिल्या दिवसअखेर 2 बाद 215 धावा उभारुन दिल्या. विराट कोहली 47 आणि पुजारा 68 धावांवर खेळत आहेत.
मयांक आणि हनुमा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भक्कम सुरुवात करून दिली. दोघांची 40 धावांची भागीदारी पॅट कमिन्सने संपुष्टात आणली. मात्र, मयांकने पदार्पणात अव्वल दर्जाची खेळी केली आणि अर्धशतक झळकावून 71 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. त्याने 161 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकार खेचून 76 धावा केल्या. कमिन्सने त्याला झेलबाद केले. मयांकने दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासह अर्धशतकी भागीदारी केली. मयांक बाद झाल्यानंतर पुजारा आणि कर्णधार
विराट कोहली यांनी भारताच्या धावांचा वेग कायम राखला. पुजाराने कसोटीतील 21वे अर्धशतक झळकावताना कोहलीसह अर्धशतकी भागीदारी केली.