Join us

IND vs AUS 3rd Test : भारतीय गोलंदाजांचा पराक्रम, मोडला 39 वर्षांपूर्वीचा विक्रम 

IND vs AUS 3rd Test: मेलबर्न कसोटीचा तिसरा दिवस गाजवला तो भारतीय गोलंदाजांनी... यजमान ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ शंभर धावांच्या आत माघारी पाठवून त्यांनी भारताला विजयाचे स्वप्न दाखवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 09:47 IST

Open in App
ठळक मुद्देभारतीय गोलंदाजांची कमाल, केला अनोखा विक्रम2018 मध्ये घेतल्या 250 हून अधिक विकेटइंग्लंड दौऱ्यात नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न कसोटीचा तिसरा दिवस गाजवला तो भारतीय गोलंदाजांनी... यजमान ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ शंभर धावांच्या आत माघारी पाठवून त्यांनी भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आणि त्या उत्तरात मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची चांगलीच तारांबळ उडाली. उपाहारापर्यंत त्यांचे चार फलंदाज तंबूत परतले होते आणि त्यात आणखी दोघांनी भर घातली. ऑसींचे 6 फलंदाज 102 धावांवर माघारी पाठवून भारताने त्यांच्यावर फॉलोऑनचे सावट निर्माण केले. भारतीय गोलंदाजांनी या उल्लेखनीय कामगिरीबरोबर 39 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केला. 

भारतीय संघासाठी 2018 हे वर्ष कसोटी मालिकेच्या दृष्टीने तितकेसे चांगले गेलेले नाही. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात भारताला पराभव पत्करावा लागला. मायदेशात मात्र भारतीय संघाने अफगाणिस्तान व वेस्ट इंडिज यांना पराभवाची धुळ चारली. परदेश दौऱ्यात कर्णधार विराट कोहली वगळता भारताच्या अन्य फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण, गोलंदाजांनी आपली भूमिका चोख वटवली. परदेश दौऱ्यावर भारतीय गोलंदाजांनी सर्वाधिक यशस्वी कामगिरी केली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय गोलंदाजांनी ही लय कायम राखली आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे 6 फलंदाज 102 धावांवर माघारी पाठवले. या कामगिरीने त्यांनी 2018 मध्ये 251 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. 1979 नंतर प्रथमच भारतीय गोलंदाजांनी एका वर्षात सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. 39 वर्षांपूर्वी भारतीय गोलंदाजांनी 249 विकेट घेतल्या होत्या. तो विक्रम 2018मध्ये मोडला गेला.

भारतीय गोलंदाजांनी 2018 मध्ये खेळलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक 85 विकेट्स इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांत घेतल्या. दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यातं भारताने 60, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांत 40 आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव सामन्यात 20 बळी टिपले आहेत. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया मालिकेत भारतीयांनी आतापर्यंत 46 विकेट घेतल्या आहेत. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजामोहम्मद शामीजसप्रित बुमराहइशांत शर्माआर अश्विन