ठळक मुद्देभारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केलारोहित शर्माच्या नाबाद 63 धावाचेतेश्वर पुजाराच्या शतकाने गाजवला दुसरा दिवस
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजारा (106) आणि कर्णधार विराट कोहली (82) यांनी उभ्या केलेल्या डोलाऱ्यावर अन्य फलंदाजांनी धावांचे इमले रचले. भारताने बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 443 धावांवर डाव घोषित केला. कसोटीत कमबॅक करणाऱ्या रोहित शर्माने (63*) अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले. भारताने चार वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात एका डावात चारशेपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर एकही विकेट न गमावता 8 धावा केल्या आहेत. ते 435 धावांनी पिछाडीवर आहेत.
मयांक अग्रवालच्या दमदार खेळीनंतर पुजाराने कर्णधार
विराट कोहलीने भारतीय संघाची घोडदौड सुरू ठेवली. पहिल्या दिवसात भारताने केवळ दोनच गडी गमावत 215 धावा केल्या होत्या. पुजारा 68 आणि कोहली 47 धावांवर खेळत होते. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि उत्सुकता लागली ती पुजाराच्या शतकाची. पुजाराने 280 चेंडूत कारकिर्दीतील 17 वे शतक पूर्ण केले. पुजारा व कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी केली. ही जोडी मिचेल स्टार्कने संपुष्टात आणली. स्टार्कने कोहलीला बाद केले. कोहली 82 धावांवर बाद झाला.
त्यानंतर उप कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या धावांचा वेग कायम राखला, परंतु या दोघांची 62 धावांची भागीदारी नॅथन लियॉनने संपुष्टात आणली. लियॉनने रहाणेला पायचीत करत ही जोडी तोडली. रोहितने त्यानंतर संयमी खेळी करताना अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला चारशे धावांचा पल्ला ओलांडून दिला. रोहितने 114 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 63 धावा केल्या.