ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर दमदार पुनरागमन करत यजमान संघाला ४६.४ षटकांत केवळ २३६ धावांत गुंडाळले. या सामन्यात युवा गोलंदाज हर्षित राणा याने भेदक मारा करत ४ विकेट्स घेतल्या. तर, अनुभवी फलंदाज विराट कोहलीने क्षेत्ररक्षणात विक्रमी कामगिरी केली.
मागील दोन सामन्यांमध्ये फलंदाजीत अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने सामन्यात एकूण दोन झेल घेतले. या कामगिरीसह विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा परदेशी क्षेत्ररक्षक बनला आहे. कोहलीच्या नावावर आता ऑस्ट्रेलियात ३८ झेल झाले असून, त्याने इंग्लंडच्या इयान बॉथम यांचा जुना विक्रम मोडला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅट रेनशॉने (५६ धावा) आणि मिचेल मार्शने (४१ धावा) चांगली सुरुवात केली आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे वर्चस्व होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने, जोरदार पुनरागमन केले हर्षित राणाने आपल्या स्पेलमध्ये प्रभावी मारा करत एकूण चार महत्त्वाचे विकेट्स घेतल्या. त्याला वॉशिंग्टन सुंदरने (दोन विकेट्स) चांगली साथ दिली. या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि २३६ धावांवर ऑल आऊट झाला. हा सामना जिंकून भारताचा व्हाइटवॉश टाळण्याचा प्रयत्न आहे.