India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ऑस्ट्रेलियाने तिसरी वन डे मॅच ६६ धावांनी जिंकून भारताविरुद्ध व्हाईटवॉश टाळला. ३५२ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण संघ २८६ धावांवर तंबूत परतला. ग्लेन मॅक्सवेलने १० षटकांत ४० धावांत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने ही मालिका २-१ अशी जिंकली. विजयानंतर निरंजन शाह ट्रॉफी देण्यासाठी आले होते, परंतु रोहित शर्माने ती स्वतः न स्वीकारता दुसऱ्याच खेळाडूला बोलावले अन्...
ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३५२ धावांचा डोंगर उभा केला. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी १३७ धावांची भागीदारी केली. मार्श ८४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९६ धावांवर बाद झाला, तर स्मिथने ६१ चेंडूंत ७४ धावा केल्या. अॅलेक्स केरी ( ११), ग्लेन मॅस्कवेल ( ५), कॅमेरून ग्रीन ( ९) यांना झटपट माघारी पाठवून भारतीय गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. मार्नस लाबुशेनने ५८ चेंडूंत उपयुक्त ७२ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने ३ आणि कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या.

भारताकडून रोहित शर्माने ५७ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ८१ धावा केल्या. विराट कोहलीनेही ५६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ४८ धावांची खेळी केली, परंतु इतरांनी निराश केले. मॅक्सवेलने वॉशिंग्टन सुंदर, रोहित, विराट व श्रेयस या विकेट्स घेतल्या. लोकेश राहुल ( २६) व रवींद्र जडेजा ( ३५) यांचा संघर्ष तोकडा पडला. जोश हेझलवूडने २ विकेट्स घेतल्या. रोहितने ट्रॉफी स्वीकारण्यासाठी लोकेश राहुलला बोलावले... लोकेशच्या नेतृत्वाखाली भारताने या मालिकेतील पहिल्या दोन वन डे मॅच जिंकल्या होत्या. त्यानंतर सेलिब्रेशन करताना ही ट्रॉफी सौराष्ट्रच्या स्थानिक खेळाडूंच्या हाती दिली.
