ठळक मुद्देविराट कोहलीची खेळी 123 धावांवर संपुष्टातऑस्ट्रेलियातील सहावे कसोटी शतकसचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय
पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची साजेशी सुरुवात करता आलेली नाही. मात्र, कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले. कोहलीने दुसऱ्या दिवसअखेर 82 धावा केल्या होत्या आणि रविवारी त्याने शतक पूर्ण केले. त्याने त्यात आणखी 11 धावांची भर घालताच एका विक्रमाची नोंद केली. त्याने 111 धावांचा पल्ला गाठताच दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर असलेला विक्रम मोडला. पॅट कमिन्सने कोहलीला 123 धावांवर बाद केले.
कोहलीने पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. 2018 मधील त्याचे हे पाचवे कसोटी आणि सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधील 11वे शतक ठरले. 3 बाद 172 धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात झटका बसला. त्यानंतर कोहलीने जबाबदारीने खेळ करताना भारताच्या धावांचा वेग कायम राखला. त्याने 214 चेंडूंत शतक पूर्ण केले. कोहलीचे हे ऑस्ट्रेलियातील सहावे कसोटी शतक ठरले. तेंडुलकरनेही ऑस्ट्रेलियात यजमानांविरुद्ध सहा कसोटी शतकं झळकावली आहेत.
शतकानंतर अनेक विक्रम नावावर करणाऱ्या कोहलीने 111 धावांचा पल्ला गाठताच पराक्रम केला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने पाच हजार धावांचा पल्ला गाठला. चौथ्या क्रमांकावर सर्वात जलद 5000 धावा करण्याचा विक्रम कोहलीने नावावर केला. त्याने 86 डावांत 5012 धावा करताना कॅलिसचा विक्रम मोडला. कॅलिसने 87 डावांत हा पल्ला गाठला होता. या दोघांनंतर सचिन तेंडुलकर ( 93 डाव), जावेद मियाँदाद ( 99) आणि ब्रायन लारा ( 100) यांचा क्रमांक येतो.