ठळक मुद्देभारताचे दोन फलंदाज 8 धावांवार माघारीविराट कोहली व चेतेश्वर पुजाराने डाव सावरलाविराट कोहली थोडक्यात बचावला
पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर गुंडाळला. पहिल्या दिवशी 6 बाद 277 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला शनिवारी 49 धावांची भर घालता आली. त्यांचे तळाचे चार फलंदाज बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना जवळपास 20 षटकं टाकावी लागली. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात लाजीरवाणी झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 8 धावांवर माघारी परतले. मुरली विजय (0) आणि लोकेश राहुल ( 2) यांना अनुक्रमे मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवुड यांनी त्रिफळाचीत केले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी संयमी खेळ करताना संघाचा डाव सावरला. मात्र, कोहलीचे एक धाडस भारताला महागात पडले असते. नॅथन लियॉनच्या षटकात एक चेंडू सोडण्याचा मोह कोहलीच्या अंगलट आला असता.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 326 धावांचा पाठलाग करताना भारताला तिसऱ्याच षटकात धक्का बसला. स्टार्कच्या अप्रतिम चेंडूवर सलामीवीर विजय भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यानंतर सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हेझलवुडने राहुलचा त्रिफळा उडवला. कोहली व पुजारा ही जोडी संयमाने खेळ करत होती. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला खरा, परंतु लियॉनच्या फिरकीवर ते चाचपडताना दिसले. सामन्याच्या 18व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीची विकेट पडली असली, परंतु भारताच्या सुदैवाने तसे झाले नाही. लियॉनने टाकलेला चेंडू आत येत असल्याचे माहित असूनही तो सोडण्याचे धाडस कोहलीने केले. तो चेंडू यष्टिच्या काही सेंटीमीटर जवळून गेला. तो चेंडू किंचितसाही खाली राहिला असता तरी कोहलीच्या यष्टिचा वेध घेतला असता.
तत्पूर्वी, पहिल्या दिवशीच 277 धावा करताना त्यांनी भारताला कडवी टक्कर दिली. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यात 49 धावांची भर घातली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांत गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले.