ठळक मुद्देयजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत कमबॅक केले.विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थकेवळ चारच भारतीयांना पर्थवर शतक झळकावता आले आहे
पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत कमबॅक करताना भारताला दुसऱ्या कसोटीत पराभवाची चव चाखवली. ऑस्ट्रेलियाच्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 140 धावांत माघारी परतला. पाचव्या दिवसाच्या पहिल्या पंधरा षटकांत भारताचे उर्वरित पाच फलंदाज बाद झाले आणि कांगारूंनी 146 धावांनी विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. भारताचा कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ गेली. या पराभवाने पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली.
1992नंतर पर्थवर कसोटी शतक झळकावणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे होता. 1992 मध्ये तेंडुलकरने अशी कामगिरी केली होती. 1992 मध्ये फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तेंडुलकरने ही शतकी खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 346 धावांचा पाठलाग करताना तेंडुलकरने 161 चेंडूंत 114 धावा केल्या होत्या आणि त्यात 16 चौकारांचा समावेश होता. मात्र, भारताला तो सामना वाचवता आला नव्हता.
26 वर्षांनंतर भारतीयाने येथे शतक झळकावूनही विजयाने हुलकावणी दिली. याआधीही 1977 मध्ये असे घडले आहे. सुनील गावसकर आणि मोहींदर अमरनाथ यांनी येथे शतकी खेळी केली होती. अमरनाथ यांच्या 100 आणि गावसकर यांच्या 127 धावांच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियासमोर 342 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने दोन विकेटने तो सामना जिंकला होता.