ठळक मुद्देविराट कोहलीचे कसोटीतील 20 वे अर्धशतककोहलीच्या 109 चेंडूंत 50 धावा चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेसह अर्धशतकी भागीदारी
पर्थ, भारत विरुद्घ ऑस्ट्रेलिया: कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाचा डाव सावरला. 2 बाद 8 अशा दयनीय अवस्थेत असणाऱ्या भारतीय संघाला त्याने चेतेश्वर पुजारासह सुस्थितीत आणले. कोहली व पुजारा या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 74 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मिचेल स्टार्कने पुजाराला बाद करत ही भागीदारी संपुष्टात आणली, परंतु, कोहलीचे धावांचा वेग कायम राखला. कोहलीने चौथ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणेसह धावगती कायम राखली. कोहलीने या दरम्यान 20 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. या खेळीसह त्याने कोणत्याही भारतीय फलंदाजाला न जमलेला विक्रम नावावर केला.
कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी पुजारासह 74 धावा जोडल्या. त्यांच्या या भागीदारीने अडचणीत सापडलेला संघ सुस्थितीत आला. 103 चेंडूंत 24 धावा करणारा पुजारा बाद झाल्यानंतर कोहलीने सामन्याची सुत्रे हाती घेतली. त्याने रहाणेला मनमोकळी फटकेबाजी करण्याची संधी दिली आणि दुसऱ्या बाजूने तो खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. कोहलीने 109 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताच विक्रम नावावर केला.
चालू कॅलेंडर वर्षात कोहलीने 19 पेक्षा अधिक वेळा पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने चौथ्यांदा हा पराक्रम केला असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. आजच्या अर्धशतकी खेळीनंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. पाँटिंग व संगकारा यांनीही 4 वेळा कॅलेंडर वर्षांत 19 पेक्षा अधिक वेळा पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत.