पर्थ, भारत विरुद्घ ऑस्ट्रेलिया : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पर्थ कसोटीत दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या दिवशीच 277 धावा करताना त्यांनी भारताला कडवी टक्कर दिली. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यात 49 धावांची भर घातली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांत गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात तीनशे धावांचा पल्ला पार करून विजयाची संधी वाढवली आहे. 2018 मधील त्यांची कामगिरीही हेच सांगते.
पर्थ कसोटीच्या पहिला दिवस चांगलाच रंगला. पहिल्या सत्रात भारताला एकही बळी मिळाला नसला तरी त्यानंतरच्या दोन्ही सत्रात भारताने प्रत्येकी तीन बळी मिळवले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली, त्यामुळेच सामना दोलायमान अवस्थेत पाहायला मिळाला. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने सहा बळी गमावत 277 धावांपर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या दिवशी कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्स यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून भारताची डोकेदुखी वाढवली. उमेश यादवने कमिन्सला बाद करून दुसऱ्या दिवसातील पहिले यश मिळवून दिले. त्यापाठोपाठ जसप्रीत बुमराने पेनला माघारी पाठवले.
सेट जोडी माघारी परतल्यानंतर इशांत शर्माने तळाचे फलंदाज बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव 326 धावांत गुंडाळला. शर्माने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याला बुमरा, शर्मा आणि हनुमा विहारी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 326 धावा करत भारताला धोक्याचा इशारा दिला आहे. 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी तितकी चांगली झाली नसली तरी तीनशेपल्ल्याड आकडा हा त्यांच्यासाठी शुभ राहिला आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात तीनशेपेक्षा अधिक धावा केलेल्या सामन्यात विजय मिळवला आहे आणि भारतासाठी हा धोक्याचा इशारा म्हणावा लागेल.