ठळक मुद्देमोहम्मद शमीच्या गोलंदाजीसमोर ऑसी निरुत्तरउपाहारानंतर घेतल्या चार विकेट्स2003 नंतर ऑस्ट्रेलिताय भारतीय गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी
पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ड्राईव्हिंग सीटवर बसलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला उपाहारानंतर भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने बाजूला केले. शमीने उपाहारानंतर चार धक्के दिले आणि 4 बाद 192 अशा मजबूत अवस्थेत असलेला ऑस्ट्रेलियाची अवस्था 9 बाद 207 झाली. जसप्रीत बुमरानेही एक विकेट घेतली. शमीने या कामगिरीसह कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने कारकिर्दीत प्रथमच 6 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पंधरा वर्षांनतर भारतीय गोलंदाजाने ऑस्ट्रेलियात असा पराक्रम केला.
ऑस्ट्रेलियाने उपहारापर्यंत 4 बाद 192 अशा धावा करून मोठ्या आघाडीच्या दिशेने कूच केली होती, परंतु त्यानंतर शमीने ऑसी फलंदाजांची तारांबळ उडवली. त्याने टीम पेन ( 37), उस्मान ख्वाजा ( 72) या सेट जोडीसह अॅरोन फिंच ( 25) आणि नॅथन लियॉन ( 5) यांना माघारी पाठवले. ख्वाजाच्या विकेटसह शमीने विकेटचे पंचक पूर्ण केले. त्याने 2018 मध्ये दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेटच्या एका डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.
शमीच्या तिखट माऱ्याने मजबूत स्थितीत असलेले यजमान बॅकफूटवर गेले. 2003 नंतर भारतीय गोलंदाजाने ऑस्ट्रेलियात सहा विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 2003 मध्ये अजित आगरकरने 41 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या आणि त्या सामन्यात भारताला विजय मिळवता आला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात सहा विकेट घेणारा शमी हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. 2018 मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा मानही शमीने पटकावला. त्याने 11 कसोटी सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत.