IND vs AUS 2nd T20I Live : भारतीय यंग ब्रिगेडने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी दिली. यशस्वी जैस्वाल, इशान किशन व ऋतुराज गायकवाडच्या वैयक्तिक अर्धशतक आणि रिंकू सिंगच्या फिनिशिंग टचने भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर रवी बिश्नोईने पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यात कांगारूंना अडकवले. प्रसिद्ध कृष्णाने भन्नाट यॉर्कर टाकले.
यशस्वी २५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५३ धावांवर झेलबाद झाला. यशस्वी व ऋतुराज यांनी ५.५ षटकांत ७७ धावांची भागीदारी केली. इशानने ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावा चोपल्या आणि ऋतुराजसह ५८ चेंडूंत ८७ धावा जोडल्या. ऋतुराजने ४३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. रिंकूने ९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांची नाबाद ३१ धावांची खेळी केली आणि टीम इंडियाने २० षटकांत ४ बाद २३५ धावा उभ्या केल्या.
मॅथ्यू शॉर्ट व स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाला आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु रवी बिश्नोईने तिसऱ्या षटकात भारताला विकेट मिळवून दिली. शॉर्ट १९ धावांवर त्रिफळाचीत झाला. बिश्नोईने त्याच्या पुढच्या षटकात जोश इंग्लिसला बाद करून ऑसींनी खूप मोठा धक्का दिला. त्यात सहाव्या षटकात अक्षर पटेलने ग्लेन मॅक्सवेलची ( १२) विकेट मिळवली. प्रसिद कृष्णाने त्याच्या दुसऱ्या अन् सामन्यातील ८व्या षटकात अनुभवी स्मिथची ( १९) विकेट मिळवून दिली. टीम डेव्हिड व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला आशेचा किरण दाखवला होता. दोघांनी ६ षटकांत ८१ धावांची भागीदारी करून सामना ऑसींसाठी जीवंत ठेवला होता.
पुन्हा बिश्नोईने भागीदारी तोडली. टीम डेव्हिड २२ चेंडूंत ३७ धावांवर झेलबाद झाला. बिश्नोईने त्याच्या ४ षटकांत ३२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. मुकेश कुमारने १५व्या षटकांत स्टॉयनिसची विकेट घेतली. स्टॉयनिसने २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावा केल्या. या विकेटने ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. कृष्णाने ( ३-४१) पुढील षटकात सीन एबॉटचा ( १) त्रिफळा उडवला. त्याच षटकात कृष्णाने नॅथन एलिसचा त्रिफळा उडवला. मॅथ्यू वेडने ( नाबाद ४२) अखेरपर्यंत खेळ करून ऑस्ट्रेलियाला ९ बाद १९१ धावांपर्यंत पोहोचवले. भारताने ४४ धावांनी सामना जिंकला.