IND vs AUS 2nd ODI Virat Kohli Registered Back To Back Ducks : क्रिकेट जगतात रनमशिन अशी ओळख असलेला विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ॲडलेडच्या ओव्हल वनडेत खातेही न उघडता माघारी फिरला. पर्थच्या मैदानातील पहिल्या वनडेनंतर सलग दुसऱ्यांदा त्याच्यावर शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. मोठ्या क्रिकेट कारकिर्दीत कोहली पहिल्यांदाच सलग दोन सामन्यात खाते उघडण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. पर्थ वनडेत ८ चेंडूत भोपळा पदरी पडलेल्या विराट कोहली ॲडलेडच्या मैदानात सगळी कसर भरून काढेल, अशी अपेक्षा होती. कारण या मैदानात त्याचा रेकॉर्ड तगडा आहे. पण झेवियर बार्टलेट याने कमालीच्या सेटअपसह खातेही न उघडू देता त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पहिले दोन-तीन चेंडू ऑफ स्टंप बाहेर काढत एक चेंडू त्याने आत आणला अन् विराट कोहली त्याच्या जाळ्यात फसला.
चाहत्यांचे आभार मानत मैदान सोडत किंग कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा?
ऑस्ट्रेलियातील ॲडलेडचं मैदान कोहलीच्या आवडत्या स्टेडियमपैकी एक आहे. या मैदानात त्याची फलंदाजी पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन चाहत्यांनीही मोठी गर्दी केली होती. पण विराट कोहली खातेही न उघडता माघारी फिरला. मैदान सोडताना विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियन चाहत्यांना अभिवादन करत मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियातील ॲडलेडच्या मैदानातील हा शेवटचा सामना आहे, याची पुष्टी करणारी होती.
कोहलीसाठी खास राहिलं आहे ॲडलेडचं मैदान
ॲडलेड येथील ओव्हलच्या मैदान किंग कोहलीनं १२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इथं कोहलीनं ६५ च्या सरासरीसह ९७५ धावा केल्या आहेत. या मैदानात कोहलीच्या खात्यात ५ आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद असून वनडेत या मैदानात दोन शतके झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांच्या यादीत त्याचे नाव दिसते. ऑस्ट्रेलियातील ओव्हलच्या मैदानात कोहलीशिवाय मार्क वॉ, डेविड वॉर्नर आणि ग्रीम हिक यांनी वनडेत २ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या मैदानांवर विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय शतकी कामगिरी :
- ॲडलेड, ओव्हल: ५ शतके (१७ डावांत)
- मेलबर्न - २ शतकं (१८ डावांत)
- पर्थ स्टेडियम: २ शतकं (६ डावांत)
- होबार्ट: १ शतक (१ डावात)
- मनुका ओव्हल: १ शतक (३ डावांत)
- सिडनी: १ शतक (१९ डावांत)
- ब्रिस्बेन: ० शतकं (८ डावांत)
- स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनी: ० शतकं (१ डावात)
- डब्ल्यू.ए.सी.ए. ग्राउंड, पर्थ: ० शतकं (७ डावांत)