India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. मिचेल स्टार्क, सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी भारताला २६ षटकांत ऑल आऊट केले. त्यानंतर मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड यांनी भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले आणि ११ षटकांत विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स व २३४ चेंडू राखून हा सामना जिंकताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. चेंडू राखण्याच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. ऑस्ट्रेलियाचाही हा मोठा विजय ठरला. यापूर्वी त्यांनी अमेरिकेवर २५३ चेंडू व ९ विकेट्स राखून विजय मिळवला होता.
स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. फॉर्मात असलेल्या मिचेल स्टार्ककडून त्याने सलग षटकं फेकून घेतली अन् मार्शनेही चार विकेट्स घेत त्याचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी धक्के दिले. स्मिथने ( Steve Smith) दोन अविश्वसनीय झेल घेताना रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांना माघारी पाठवले. भारताचा संपूर्ण संघ ११७ धावांत माघारी परतला. मिचेल स्टार्कने ५३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. सीन एबॉचटने २३ धावांत ३ आणि नॅथन एलिसने १३ धावांत २ धक्के दिले. विराट कोहली ( ३१) आणि अक्षर पटेल ( २९*) यांनी संघर्ष केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"