अॅडिलेड : भारतीय संघाने जबरदस्त गोलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळत ५३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र, यावेळी भारताला खराब क्षेत्ररक्षणाचाही मोठा फटका बसला. क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाच्या डावात काही सोपे झेल सोडले. जर का हे झेल घेण्यात भारताला यश आले असते, तर नक्कीच भारताला मजबूत आघाडी घेता आली असती. सध्या भारताकडे दुसऱ्या दिवसअखेर एकूण ६२ धावांची आघाडी आहे.
भारताने यजमानांचा डाव गुंडाळल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ९ धावा अशी सुरुवात केली. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (४) पुन्हा एकदा अपयशी ठरला. मयांक अग्रवाल (५*) आणि नाईट वॉचमन म्हणून मैदानात आलेला जसप्रीत बुमराह (०*) यांनी दिवसअखेर टिकून राहत ऑस्ट्रेलियाला बळी मिळवण्यापासून रोखले.
शुक्रवारी ६ बाद २३३ धावांवरून सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाचा डाव कांगारूंनी २४४ धावांवर संपवला. यावेळी ऑसी खेळाडूंची देहबोली पाहता, ते सामन्यावर वर्चस्व गाजवणार असे दिसत होते. मात्र, भारताचा हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला हे मान्य नव्हते. त्याने अपेक्षित भेदक मारा करताना मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या सलामीवीरांना पायचित पकडत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्के दिले. यानंतर, अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आपली जादू दाखवत कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१), ट्राविस हेड (७) व कॅमरुन ग्रीन (७) यांना स्वस्तात बाद करत कांगारूंची ५ बाद ७९ धावा अशी अवस्था केली.
यजमानांची अवस्था याहून अधिक बिकट झाली असती. मात्र, युवा फलंदाज मार्नस लाबुशेन याला चक्क तीन जीवदान देण्याची मोठी चूक भारतीयांनी केली. या जीवदानाचा फायदा घेतलेल्या लाबुशेनने खेळपट्टीवर चांगलाच जम बसविला. ११९ चेंडूंत ७ चौकारांसह ४७ धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेतली. त्याने कर्णधार टीम पेनसह ३२ धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा चांगला प्रयत्न केला.
२५ चेंडू आणि...
६ बाद २३३ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केलेल्या भारताला आपल्या धावसंख्येत केवळ ११ धावांचीच भर टाकता आली. केवळ २५ चेंडूंत ऑसीने उर्वरित चार बळी मिळवत भारताचा डाव संपवला. भारताने अखेरचे ७ फलंदाज ५६ धावांत गमावले. पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहली धावबाद झाला आणि भारताच्या डावाला गळती लागली. शुक्रवारी पहिल्याच षटकात अश्विनला कमिन्सने बाद केले, तर रिद्धिमान साहाला दुसऱ्या दिवशी एकही धाव काढण्यात यश आले नाही.