IND vs AUS 1st ODI Rohit Sharma Most Appearances For India Josh Hazlewood Take Wicket : पर्थच्या वनडेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला. पण माजी कर्णधाराला खास सामन्यात अविस्मरणीय खेळी करण्यात अपयश आले. फलंदाजांसाठी आव्हानात्मक असलेल्या पर्थच्या खेळपट्टीवर जोश हेजलवूडनं जोश दाखवला अन् त्याच्या फक्त ८ धावा करून तंबूत परतण्याची वेळ आली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलनंतर जवळपास २२३ दिवसांनी कमबॅक करताना रोहित शर्मा १४ चेंडूचा सामना करून माघारी फिरल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एक खणखणीत चौकार मारला, पण...
रोहित शर्मानं भारतीय एकदिसीय संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलच्या साथीनं भारतीय संघाचा डावाला सुरुवात केली. डावातील तिसऱ्या षटकातील मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला. पण त्यानंतर पुढच्या षटकात हेजलवडूनं कमालीच्या उसळत्या चेंडूवर रोहित शर्माला स्लिपमध्ये झेलबाद करत टीम इंडियाला पहिला धक्का दिला.
रोहित शर्मानं मैदानात उतरताच रचला इतिहास
पर्थच्या मैदानातील सामन्यात टॉसनंतर भारतीय संघाची घोषणा झाल्यावर रोहित शर्माचं प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव येताच त्याच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. भारतीय संघाकडून ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी तो मैदानात उतरला. याआधी फक्त चार भारतीयांनीच हा टप्पा गाठला आहे. भारताकडून आंशी कामगिरी करणारा तो पाचवा खेळाडू ठरला. पण या खास सामन्यात रोहित शर्मावर अवघ्या ८ धावांवर बाद होण्याची वेळ आली.
टीम इंडियाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे भारतीय
६६४ सचिन तेंडुलकर
५५१ विराट कोहली*
५३५ महेंद्रसिंह धोनी
५०४ राहुल द्रविड
५०० रोहित शर्मा*