ICC ODI World Cup IND vs AFG Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली. भारतीय संघाने २७३ धावांचे लक्ष्य रोहित शर्माच्या रेकॉर्ड ब्रेकिंग खेळीच्या जोरावर ३५ षटकांत पार केले. विराट कोहलीच्या घरच्या मैदानावर रोहित चमकला खरा, परंतु लोकल बॉय विराटच्या एका कृतीनं सर्व माहोल बदलला. आयपीएल २०२३ मध्ये विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन उल हकला आज प्रेक्षकांनी भरपूर ट्रोल केले. तो फलंदाजीला आला तेव्हा आणि गोलंदाजी करताना प्रेक्षकांनी विराट विराट नावाचा गजर केला. पण, विराटला हे अती होत असल्याचे वाटले अन् त्याने प्रेक्षकांना नवीनला न चिडवण्याची विनंती केली. त्यांनीही त्याचा मान राखला. हे पाहून अफगाणिस्तानचा गोलंदाज विराटकडे आला अन् त्याला मिठी मारली.
लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या नवीनने आयपीएल २०२३ मध्ये RCBच्या विराटशी पंगा घेतला होता. तो इथेच थांबला नाही तर सोशल मीडियावरूनही त्याने विराटला ट्रोल केले. त्यामुळेच आज चाहत्यांनी नवीनला सतावले. नवीन फलंदाजीला आला तेव्हा चाहत्यांनी कोहली-कोहलीच्या घोषणांनी मैदान दणाणून सोडले. अफगाणिस्तानच्या खेळाडूसमोर प्रेक्षकांनी 'विराट' नारे दिले. पण, विराटच्या विनंती नंतर हे सर्व थांबवे. २०१९मध्ये विराटने स्टीव्ह स्मिथला ट्रोल करणाऱ्या चाहत्यांना असेच गप्प राहण्यास सांगितले होते. त्याची ही खिलाडूवृत्ती सर्वांचे मन जिंकणारी ठरली.
भारताने ३५ षटकांत २ बाद २७३ धावा करून ८ विकेट्स राखून मॅच जिंकली. विराटने ५६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या. श्रेयस २५ धावांवर नाबाद राहिला. २७०+ धावांचे लक्ष्य सर्वात कमी षटकांत पार करण्याचा विक्रम भारताने नावावर केला. यापूर्वी २०१६मध्ये दक्षिण आफ्रिकेने ३६.२ षटकांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९५ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.