Join us  

अर्जुन तेंडुलकरची भारतीय संघात लागणार वर्णी? BCCI ने पाठवले 'पत्र'!

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये अखेर सचिन तेंडुलकरचा पूत्र अर्जुन याला मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिली. तीन सामने का होईना, अर्जुनला खेळवल्याने तेंडुलकर चाहते आनंदीत झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 5:29 PM

Open in App

 इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये अखेर सचिन तेंडुलकरचा पूत्र अर्जुन याला मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिली. तीन सामने का होईना, अर्जुनला खेळवल्याने तेंडुलकर चाहते आनंदीत झाले. आता त्यांचा हा आनंद द्विगुणित होणार आहे. BCCI ने देशातील २० प्रतीभावान युवा खेळाडूंना बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत शिबिरासाठी बोलावले आहे आणि त्यात अर्जुन तेंडुलकरच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे अर्जुन लवकरच भारतीय संघाकडून खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. 

अर्जुन तेंडुलकर गोवा संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो आणि आयपीएल २०२३ मध्ये त्याने आपल्या कामगिरीने प्रभावही टाकला. ऑगस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरासाठी अर्जुनला बोलावले आहे. ''या वर्षाच्या अखेरीस इमर्जिंग आशिया चषक ( २३ वर्षांखालील) स्पर्धा होणार आहे आणि बीसीसीआय त्यासाठी होतकरू युवा खेळाडूंचा शोध घेत आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली २० अष्टपैलू युवा खेळाडूंचा कॅम्प भरवण्यात येणार आहे,''अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी PTI ला नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

भारताच्या सीनियर संघाच्या निवड समितीचे हंगामी प्रमुख शिव सुंदर दास हे या शिबिरातून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करणार असल्याची माहिती मिळत आहे. या खेळाडूंमधील गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हा कॅम्प भरवण्यात येणार आहे. यामध्ये सौराष्ट्रचा डावखुरा गोलंदाज चेतन सकारिया याचाही समावेश आहे. सकारीया २०२१ मध्ये भारतीय संघाकडून खेळला होता आणि तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. 

त्याशिवाय पंजाब किंग्सचा अभिषेक शर्मा, गोवा संघाचा ऑफ स्पिनर मोहित रेडकर व राजस्थानचा मानव सुथार हेही या कॅम्पमध्ये दिसणार आहेत. दिल्लीकडून हर्षित राणा व दिविज मेहरा असतील. ''अर्जुनने रणजी करंडक स्पर्धेत शतक झळकावले आहे. तसेच डावखुऱ्या गोलंदाजाने १३०kmphच्या वेगाने गोलंदाजी केली आहे. त्याच्या गोलंदाजीत वैविधता आहे, ''असे बीसीसीआय सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App