नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आपल्या खेळात आणखी सुधारणा करु इच्छिते.
अर्जुन पुरस्कार स्विकारल्यानंतर स्मृती म्हणाली,‘ मी माझ्या फलंदाजीबाबत प्रशिक्षक रमन सर यांच्याबरोबर चर्चा केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये कायम चांगली कामगिरी करण्यासाठी मी माझ्या खेळात आणखी ताकद कशी आणू शकते यावर मी काम करत आहे.’
मानधना म्हणाली,‘ तुम्हाला कामगिरीमध्ये नेहमी सुधारणा करायला हवी. कारण प्रतिस्पर्धी संघाची तुमच्या कामगिरीकडे लक्ष असते. मी नवीन फटके मारण्यापेक्षा चेंडू वेगवेगळ्या ठिकाणी मारण्यावर भर देते.
मानधनाने बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीच्या फिटनेस शिबिरात आपल्या तंदुरुस्तीवर भर दिला. ती म्हणाली,‘ या शिबिरात आल्यानंतर खूपच चांगले वाटले. आमच्यासाठी हे गरजेचे होते. पुढील आठ महिने खूपच धावपळीचे असणार आहेत. त्यासाठी आम्हाला शारिरिक तंदुरुस्तीची गरज होती.