केपटाऊन - भारतीय फलंदाजीचा महत्त्वाचा भाग असलेल्या चेतेश्वर पुजाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान उसळी घेणाºया खेळपट्टीवर चेंडू अचूकपणे सोडणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
भारताला चार वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौºयात मालिकेत ०-१ ने पराभव स्वीकारावा लागला होता; पण त्या वेळी पुजाराव्यतिरिक्त विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांची फलंदाजीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली होती.
पुजारा म्हणाला, ‘विदेशातील खेळपट्ट्यांवर चेंडू अचूकपणे सोडणे महत्त्वाचे आहे. उपखंडाबाहेरच्या खेळपट्ट्यांवर चेंडूला अधिक उसळी मिळते.’ २९ वर्षीय पुजाराने दक्षिण आफ्रिकेचा दोनदा दौरा केला आहे. तो तिसºया मालिकेत सकारात्मक विचारसरणीने उतरण्यास प्रयत्नशील आहे. पुजारा म्हणाला, ‘या तंत्राचा संबंध मानसिकतेशी आहे. संघातील अनेक खेळाडूंना येथे खेळण्याचा अनुभव आहे ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. मी स्वत: येथे दोन दौºयांत खेळलेलो आहे. परिस्थितीनुरूप खेळणे महत्त्वाचे आहे.’ भारतीय संघ येथे चार दिवसांपूर्वी दाखल झाला असून, सराव सामना न खेळता पहिल्या कसोटी सामन्यात उतरणार आहे. संघाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही का, याबाबत पुजाराने नकारात्मक उत्तर दिले.
पुजारा म्हणाला, ‘ज्या वेळी आम्ही श्रीलंकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळत होतो, त्या वेळी दक्षिण आफ्रिका दौºयाबाबत विचार करीत होतो. आम्ही भारतातच काही अंशी तयारी केली होती. त्यामुळे संघाला तयारीसाठी वेळ मिळाला नाही, असे मला वाटत नाही. तयारीसाठी बराच वेळ आहे.’
भारतीय फलंदाजांना श्रीलंकेविरुद्ध कोलकाता व धरमशाला येथील वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर संघर्ष करावा लागला होता; पण दक्षिण आफ्रिकेत स्विंग होणाºया चेंडूपेक्षा उसळी घेणारे चेंडू अधिक महत्त्वाचे ठरतात.
पुजारा म्हणाला, ‘चेंडूला मिळणारी उसळी नेहमी आव्हान असते. पण, या वेळी आम्ही चांगली तयारी केली आहे. संघातील अनेक सदस्यांना येथे खेळण्याचा अनुभव असून त्याचा आम्हाला लाभ होईल.’
चांगल्या कामगिरीबाबत आशावादी
पुजारा म्हणाला, ‘माझ्या मते अनुभव महत्त्वाचा असतो. खेळपट्टी कशी असेल आणि प्रतिस्पर्धी संघ कसे आव्हान देईल, याची कल्पना असते. अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर धावा फटकावण्यासाठी अनुभवापेक्षा दुसरे काहीच महत्त्वाचे नसते. एक फलंदाज व संघ म्हणून तुम्हाला काय करायचे आहे, याची कल्पना असते.’
भारतीय संघाने वेस्टर्न प्रोव्हिन्स
क्रिकेट क्लबमध्ये कसून सराव केला. पुजारा आतापर्यंतच्या तयारीवर खूश आहे. पुजारा म्हणाला, ‘तयारी चांगली आहे. आम्ही आतापर्यंत तीन वेळा नेट््समध्ये सराव केला. आम्ही दिवसा २ सत्रांत सराव केला. आम्ही चांगल्या कामगिरी बाबत आशावादी आहोत.’
केपटाऊनमध्ये दुष्काळाची स्थिती आहे आणि न्यूलँड््सच्या खेळपट्टीला आवश्यक तेवढे पाणी मिळाले नाही. पाच दिवस या खेळपट्टीवर चेंडूला अधिक उसळी व वेग मिळण्याची शक्यता आहे. भारतीय फलंदाजांना कशा प्रकारच्या खेळपट्टीवर खेळावे लागेल, याबाबत पुजाराला चिंता नाही.
पुजारा म्हणाला, ‘ते कशा प्रकारच्या खेळपट्ट्या तयार करतात, याची आम्हाला चिंता नाही. आम्ही केवळ आमच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. खेळपट्टी हिरवळ असलेली असो किंवा पाटा असो आमची रणनीती स्पष्ट आहे.’
पुजाराने प्रतिस्पर्धी संघाच्या मजबूत व कमकुवत बाजूवर भाष्य करण्यास नकार दिला. भारतीय संघ आव्हान पेलण्यास सज्ज असल्याचे पुजारा म्हणाला. पुजारा पुढे म्हणाला की,‘दक्षिण आफ्रिका संघ कशी तयारी करतो, हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे.
ते कुणाला संधी देतात, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. संघ म्हणून आम्ही चांगली तयारी केली आहे. या वेळी आमचे वेगवान आक्रमण चांगले आहे. ते वेगवान मारा करण्यास सक्षम असून या वेळी आमच्यासाठी ही सकारात्मक बाब आहे.’