Join us

मला माफ कर! वोक्सची दिलगिरी; पंत म्हणाला, पुन्हा मैदानावर भेटू; इंग्लंडमध्ये पाय झाला होता फ्रॅक्चर

मँचेस्टरमध्ये चौथ्या कसोटीत वोक्सच्या चेंडूवर पंतच्या पायाला मार लागून त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:37 IST

Open in App

लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू   ख्रिस वोक्स याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान भारतीय यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या पायाच्या अंगठ्याला झालेल्या फ्रॅक्चरबद्दल माफी मागितली. त्याचवेळी त्याने पंतच्या उदार मनाचे कौतुकही केले आहे. 

मँचेस्टरमध्ये चौथ्या कसोटीत वोक्सच्या चेंडूवर पंतच्या पायाला मार लागून त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. यामुळे तो मालिकेच्या निर्णायक पाचव्या कसोटीत खेळू शकला नाही. परंतु, भारताने या धक्क्यातून सावरत ओव्हल कसोटी ६ धावांनी जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. वोक्स आणि पंत दोघांनीही गंभीर दुखापत झाल्यानंतरही मैदानावर उतरून साहसी खेळ दाखवला. पंतने मँचेस्टरमध्ये फ्रॅक्चर झालेल्या पायाच्या करंगळीसह फलंदाजी केली, तर वोक्सने पाचव्या कसोटीत खांद्याचे हाड सरकलेले असतानाही फलंदाजीस उतरण्याचा निर्णय घेतला होता.

वोक्सने एका मुलाखतीत सांगितले की, ऋषभ पंतने इन्स्टाग्रामवर मला सॅल्यूट इमोजीसह एक पोस्ट टाकली होती. त्यावर मी त्याला उत्तर दिलं, ‘प्रेमासाठी धन्यवाद आणि आशा आहे की, तुझा पाय लवकर बरा होईल.’ वोक्स पुढे म्हणाला, ‘यानंतर त्याने मला एक व्हॉइस नोट पाठवली, ज्यामध्ये तो म्हणाला, ‘आशा आहे सर्व ठीक असेल. लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपण मैदानात भेटू.’ त्यानंतर मी त्याच्याकडे पायाच्या बोटाला झालेल्या दुखापतीबाबत माफी मागितली.’

वोक्सने हेही सांगितले की, ‘ओव्हलच्या पाचव्या कसोटीत जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा भारतीय कर्णधार शुभमन गिलने त्याच्या धैर्याचे कौतुक केले. शुभमनने मला सांगितले की, हे खरंच धाडसी पाऊल होते. मी त्याला सांगितले की, तू एक अप्रतिम मालिका खेळला आहेस. तुमच्या संघाचे अभिनंदन आणि यशाचे श्रेय तुम्हाला मिळाले पाहिजे.’

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंत