Join us

...मग तुमच्या इतक्या धावांना, शतकांना काय अर्थ?; रोहित शर्मा नेमकं कोणाला ऐकवतोय?

वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघहिताला अधिक प्राधान्य; रोहित शर्माचा स्ट्रेट ड्राईव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 13:51 IST

Open in App

दुबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिले दोन सामने मोठ्या फरकानं गमावल्यानं भारताची वाटचाल खडतर झाली आहे. उपांत्य फेरी गाठायची असल्यास भारताला पुढील दोन सामन्यात मोठे विजय मिळवावे लागतील. त्यासोबतच इतर सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावं लागेल. आज टीम इंडियाचा सामना स्कॉटलँडविरुद्ध होत आहे. त्याआधी आयसीसीनं भारताचा उपकर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहितनं खेळाबद्दलच्या विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

जोपर्यंत तुम्ही चषक जिंकत नाही, मोठ्या स्पर्धांचं जेतेपद पटकावत नाही, तोपर्यंत तुम्ही केलेल्या धावांना, शतकांना काही अर्थ नसतो, असं स्पष्ट मत रोहितनं व्यक्त केलं. 'वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघासाठी केलेली कामगिरी अधिक महत्त्वाची आहे. जर तुमचा संघ एक चषक जिंकत नसेल, तर तुम्ही केलेल्या धावा, शतकं काहीच नाहीत. वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघासाठी तुम्ही दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे,' असं रोहित म्हणाला.

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवरदेखील रोहितनं भाष्य केलं. '२०१६ पासून मला खूप मोठा अनुभव मिळाला आहे. २०१६ च्या तुलनेत आता फलंदाज म्हणून मी अधिक परिपक्व झालो आहे. खेळ अधिक चांगला समजू लागला आहे. संघाला काय हवं ते समजू लागलं आहे. संघाला कोणत्या वेळी, कोणत्या परिस्थितीत काय हवं, याचा मी कायम विचार करतो. आता मी एखादा फटका खेळण्याआधी स्वत:ला विचारतो की यावेळी माझ्या संघाला याची गरज आहे का? स्वत:च्या वैयक्तिक धावांपेक्षा संघहिताला अधिक प्राधान्य द्यायला हवं,' असं रोहितनं म्हटलं.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१रोहित शर्मा
Open in App