मेरठ - भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या हुकलेल्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. जर विराट कोहलीच्या हातात असतं, तर मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षण झालो असतो, असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. अनिल कुंबळे आणि विराट कोहलीमधील वितुष्टानंतर कुंबळेने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत वीरेंद्र सेहवागही होता. मात्र अखेर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रीने बाजी मारली होती.
सेहवाग म्हणाला, कर्णधाराला संघाशी संबंधित विविध निर्णय घेण्याचा अधिकार असतो. पण अनेक बाबतीत अंतिम निर्णय त्याला घेता येत नाही. प्रशिक्षक आणि संघनिवडीमध्ये कर्णधाराची भूमिका नेहमी सल्ला देण्याची असते. मी भारतीय संघाचा प्रशिक्षक बनावे, अशी विराटची इच्छा होती. कोहलीने माझ्याशी संपर्क साधल्यानंतरच मी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. पण मी प्रशिक्षक बनू शकलो नाही. मग तुम्ही कसे म्हणू शकता की प्रत्येक निर्णयात अंतिम अधिकार कर्णधाराकडे असतात."
मात्र यावेळी बोलताना प्रशिक्षक पदासाठी एका ओळीचा अर्ज पाठवल्याच्या वृत्ताचे सेहवागने खंडन केले. एका लाइनमध्ये अर्ज पाठवल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी तयार केल्याचे तो म्हणाला. तसेच पाकिस्तानसोबक क्रिकेट खेळले गेले पाहिजे मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय सरकारनेच घेतला पाहिजे असेही तो म्हणाला. वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाकडून 104 कसोटी आणि 251 एकदिवसीय सामने खेळले होते. तसेच सेहवाग हा कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके फटकावणारा जागतिक क्रिकेटमधील केवळ तिसरा फलंदाज आहे.