ICC World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून सर्वांच्या नजरा भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) सामन्यावर खिळल्या आहेत. हा सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ५ ऑक्टोबरला स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पाकिस्तानने यापूर्वी भारतात वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला होता. यामुळेच आयसीसीने अनेक आठवड्यांच्या विलंबानंतर वेळापत्रक जाहीर केले.
पाकिस्तानचा उप कर्णधार शादाब खानने ( Shadab Khan) भारतासोबतच्या सामन्याबाबत आपले मत मांडले आहे. तो म्हणाला,''भारताविरुद्ध खेळताना वेगळाच आनंद मिळतो. या सामन्यात दडपणही वेगळे आहे. आता तिथे जायचे आहे, तेच त्यांचे होम ग्राऊंड असेल हे आम्हाला माहीत आहे. लोक आमच्या विरोधात असतील. मात्र, आम्ही तेथे वर्ल्ड कप खेळण्यासाठी जात आहोत. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्याचाच विचार न करता संपूर्ण स्पर्धेचा विचार केला पाहिजे. कारण आम्ही भारताविरुद्ध जिंकलो आणि वर्ल्ड कप हरलो तर त्याचा काही उपयोग नाही.''
शादाब म्हणाला, 'माझ्या मते, आम्ही भारताविरुद्ध हरलो, पण वर्ल्ड कप जिंकला तरी तो विजय असेल. कारण तेच आमचे मुख्य ध्येय आहे.' पाकिस्तानचा संघ ७ वर्षांनी भारतात येणार आहे. २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान त्यांनी शेवटचा भारत दौरा केला होता.
पाकिस्तानचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक ( Pakistan WC Schedule)
६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर १, हैदराबाद
१२ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालियर २, हैदराबाद
१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
२० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू
२३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान, चेन्नई
२७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई
३१ ऑक्टोबर- पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
४ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू
१२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता