Join us  

अजिंक्य रहाणेला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा विश्वास, आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरीचा निर्धार 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पराभवानंतर भारताच्या वर्ल्ड कप संघात एक बदल पाहायला मिळेल, असे सूचक विधान कर्णधार विराट कोहलीनं केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 1:06 PM

Open in App

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पराभवानंतर भारताच्या वर्ल्ड कप संघात एक बदल पाहायला मिळेल, असे सूचक विधान कर्णधार विराट कोहलीनं केलं होतं. ऑसींविरुद्धच्या मालिकेत भारताला मधल्या फळीसाठी भक्कम पर्याय शोधण्यास अपयश आले. चौथ्या क्रमांकाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. कोहलीच्या विधानानंतर अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळायला हवे, असे मत काही जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यात रहाणेनेही वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासाठी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) धमाकेदार कामगिरी करण्याचा निर्धारही त्यानं बोलून दाखवला. 30 वर्षीय रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा दाखवून दिला आहे, परंतु मर्यादित षटकांच्या सामन्यांत त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर भारतीय संघ चौथ्या क्रमांकासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यात आयपीएल स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या स्पर्धेत आपल्या कामगिरीची चुणूक दाखवून संघात कमबॅक करण्याचा रहाणेचा प्रयत्न आहे. रहाणेने 90 वन डे सामन्यांत 35.26 च्या सरासरीनं 2962 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय संघाला गरज पडली तेव्हा त्यानं सलामी आणि मधल्या फळीची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा अनुभव संघाच्या कामी येऊ शकतो.  आयपीएल स्पर्धेत रहाणे राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.  तो म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धेत संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य आहे. मग आयपीएल असो किंवा अन्य स्पर्धा त्यात धमाकेदार कामगिरी करण्याचे ध्येय आहे. सातत्याने धावा करून संघासाठी दर्जेदार कामगिरी तुम्हाला करावी लागते. सध्याच्या घडीला मी राजस्थान रॉयल्स संघाचा विचार करत आहे आणि वर्ल्ड कपसाठी आणखी बराच वेळ आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर वर्ल्ड कपमध्ये संधी चालून येईल.''"मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी करणे हे आपल्या हातात आहे आणि त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याचा विचार करून उगाच दडपण घेण्याची गरज नाही. सध्या आयपीएल हेच लक्ष्य आहे,''असे रहाणे म्हणाला. दरम्यान, आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न पाहू नका, असे विधान कोहलीनं केलं होतं. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेआयसीसी विश्वकप २०१९विराट कोहलीआॅस्ट्रेलियाराजस्थान रॉयल्सआयपीएल 2019