ठळक मुद्देदडपणाची परिस्थिती असतानाही सामन्याचे रुप बदलण्याची कुवत असलेल्या खेळाडूच्या शोधात मी होतो. धोनीमध्ये ही गुणवत्ता नक्कीच आहे.
देशाला गरज असताना महेंद्रसिंग धोनी नेमका होता कुठे, याचा खुलासा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 'ए सेंचुरी इज नॉट इनफ' या आत्मचरीत्रामध्ये केला आहे.
भारताचा संघ गांगुलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत 2003 साली झालेल्या विश्वचषकात चांगल्या लयीत होता. भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही प्रवेश कोला होता. पण अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आणि गांगुलीचे जेतेपदाचे स्वप्न भंगले होते. त्यावेळी संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी राहुल द्रविडवर होती. त्यावेळी जर धोनी संघात असता तर कदाचित बदलले असते, असे काहीसे गांगुलीला वाटत आहे.
गांगुलीच्या नेतृत्वाखालीच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. धोनीच्या फलंदाजीने गांगुली प्रभावित झाला होता. त्यामुळेच त्याला तिसऱ्या स्थानावर बढती देण्याचा निर्णयही गांगुलीनेच घेतला होता. गांगुली आपला अखेरचा सामना धोनीच्या नेतृत्वाखालीच खेळला होता.
याबाबत गांगुली म्हणाला की, महेंद्रसिंग धोनीला मी 2004 साली पाहिले. पहिल्या दिवसापासूनच मी धोनीच्या खेळाच्या प्रेमात पडलो होतो. तो जर 2003 साली झालेल्या विश्वचषकात असायला हवा होता. जेव्हा आम्ही या विश्वचषकाची अंतिम फेरी खेळत होतो. तेव्हा धोनी हा भारतीय रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस (टीसी) म्हणून काम करत होता.
गांगुलीला धोनी संघात नसल्याची रुखरुख का वाटली, याचे उत्तरही गांगुलीने दले आहे. दडपणाची परिस्थिती असतानाही सामन्याचे रुप बदलण्याची कुवत असलेल्या खेळाडूच्या शोधात मी होतो. धोनीमध्ये ही गुणवत्ता नक्कीच आहे. तो जर 2003 साली झालेल्या विश्वचषकात भारतीय संघात असता तर कदाचित आपल्या काही वेगळे पाहायला मिळाले असते, असे गांगुली म्हणाला.