Join us  

चार दिवसांची कसोटी लढत अनिवार्य करण्याचा विचार

व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात वेळेची बचत करण्यावर देणार भर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 1:49 AM

Open in App

मेलबोर्न : २०२३ च्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमधील लढती अनिवार्यपणे चार दिवसांच्या करण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) विचार आहे. यामुळे व्यस्त वेळापत्रकात वेळेची बचत होऊ शकेल, या उद्देश हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. आयसीसी समितीने २०२३ ते २०३१च्या सत्रासाठी कसोटी सामने अनिवार्यपणे पाच दिवसांऐवजी चार दिवसांचे करण्याचा विचार मांडला आहे.एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार यामागे अनेक कारणे आहेत. आयसीसीला वेळेची बचत करुन अनेक जागतिक स्पर्धांचे आयोजन करायचे आहे. बीसीसीआयनेही यंदाच्या सत्रात अधिक द्विपक्षीय मालिकांची मागणी केली. याशिवाय जगभरात टी२० लीगचा वेगवान प्रसार होत असताना पाच दिवसांच्या सामन्यावर होणाऱ्या खर्चाची बचत करता येईल.२०१५-२०२३ सत्रात चारदिवसीय सामने झाले असते, तर किमान ३३५ दिवसांची बचत झाली असती. चार दिवसांची कसोटी हा नवा तोडगा नाहीच. यंदा सुरुवातीला इंग्लंड- आयर्लंड यांच्यात चार दिवसांचा कसोटी सामना झाला होता. याआधी २०१७ मध्ये द. आफ्रिका- झिम्बाब्वे यांच्यातही असा सामना खेळविण्यात आला. मात्र या मुद्दावर वेगवेगळे विचार व्यक्त होऊ शकतात.क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे प्रमुख केविन रॉबर्ट्स म्हणाले, ‘ चार दिवसांच्या सामन्यावर गंभीर विचार व्हावा भावना बाजूला ठेवून विचार करावा लागेल. मागील पाच- दहा वर्षांत कसोटी सामन्यांसाठी लागलेला वेळ अकारण खर्ची गेला का, असा विचार झाला पाहिजे.’ त्याचप्रमाणे, ‘२०२३ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद सामने चारदिवसीय खेळविण्याच्या निर्णयावर आत्ताच वक्तव्य करणे घाईचे ठरेल,’ असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले. (वृत्तसंस्था)ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन हा मात्र याविषयी फारसा उत्सुक नाही. मेलबोर्न येथे न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी २४७ धावांनी जिंकल्यानंतर तो म्हणाला,‘असे झाले असते तर अ‍ॅशेस मालिकेत आम्हाला जे निकाल मिळाले ते मिळू शकले नसते. या मालिकेतील प्रत्येक सामना पाचव्या दिवसापर्यंत रंगला होता. कसोटी क्रिकेटची हीच विशेषत: आहे. पाच दिवसांचा सामना मानसिक आणि शारीरिक परीक्षा घेणारा असतो. प्रथमश्रेणीत चार दिवसांचे सामने खेळाडूंची मोठी परीक्षा घेतात. याच कारणास्तव सामने पाच दिवसांचे ठेवण्यात आले. हेच सूत्र पुढे कायम असायला हवे.’

टॅग्स :आयसीसी