Join us  

आयसीसीच्या नव्या नियमाचा बसू शकतो महेंद्रसिंग धोनीला फटका, फेक फिल्डिंगच्या नियमाखाली होऊ शकतो दंड

आयसीसीचा नवा कायदा  41.5 नुसार, क्षेत्ररक्षण करणा-या एखाद्या खेळाडूने आपल्या शब्दाने किंवा कृतीने फलंदाजाला विचलित करणे अनुचित आहे. जर अम्पायरला खेळाडूने जाणुनबुजून असं कृत्य केल्याचं दिसलं तर दंड म्हणून फलंदाजी करणा-या संघाला पाच धावा अतिरिक्त देण्यात येणार. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 12:29 PM

Open in App
ठळक मुद्देआयसीसीचा नवा नियम  41.5 नुसार, क्षेत्ररक्षण करणा-या एखाद्या खेळाडूने आपल्या शब्दाने किंवा कृतीने फलंदाजाला विचलित करणे अनुचित आहेखेळाडूने जाणुनबुजून असं कृत्य केल्याचं दिसलं तर दंड म्हणून फलंदाजी करणा-या संघाला पाच धावा अतिरिक्त देण्यात येणारभारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यानेदेखील आयसीसीच्या नव्या नियमावर ताशेरे ओढले आहेत

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी त्याच्या सर्वोत्तम नेतृत्वासोबतच आपल्या चलाखीसाठीही ओळखला जातो. अनेकदा बॉल हातात नसतानाही समोरच्या फलंदाजाला थ्रो करत असल्याचं भासवून रन न घेण्यास भाग पाडणे असो किंवा फिल्डरकडून येणारा थ्रो पकडत असल्याचं दाखवत नंतर तसाच स्टम्पवर जाऊन द्यायचा आणि रन आऊट करायचं, अशा चलाखी खेळीमुळे धोनीचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. पण यापुढे अशी चलाखी करणं धोनीला महागात पडू शकतं. नुसतंच महाग नाही तर 'फेक फिल्डिंग' म्हणजेच 'खोटं क्षेत्ररक्षण' केल्याच्या नियमांतर्गत धोनीला दंडही आकारला जाऊ शकतो. आयसीसीने नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून यामध्ये या नियमाचाही समावेश आहे. आयसीसीच्या या नियमाला अनेकांनी विरोध केला आहे. 

आयसीसीचा नवा नियम  41.5 नुसार, क्षेत्ररक्षण करणा-या एखाद्या खेळाडूने आपल्या शब्दाने किंवा कृतीने फलंदाजाला विचलित करणे अनुचित आहे. जर अम्पायरला खेळाडूने जाणुनबुजून असं कृत्य केल्याचं दिसलं तर दंड म्हणून फलंदाजी करणा-या संघाला पाच धावा अतिरिक्त देण्यात येणार. 

28 सप्टेंबर 2017 पासून आयसीसीच्या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. नियम लागू होताच 24 तासात क्वीन्सलँड संघाला या नियमाचा भुर्दंड भोगावा लागला आहे. क्वीन्सलँड संघाचा खेळाडू मॅरनस याच्यावर फेक फिल्डिंगचा आरोप करण्यात आला. ऑस्ट्रेलियामध्ये लिमिटेड ओव्हर्स सामने खेळवले जात असून जेएलटी वन-डे कपमधील सामन्यादरम्यान क्वीन्सलँड संघाला या नियमाचा फटका बसला. 

तसं पहायला गेलं तर अनेकदा खेळाडू चलाखी करत समोरच्या खेळाडूला फसवत असतात. क्रिकेटचा हा एक भाग असून यावर आक्षेप घेणं कितपत योग्य आहे हा एक वादाचा विषय आहे. दरम्यान यामुळे अम्पायर्सची चांगलीच गोची होणार आहे. कारण एखाद्या खेळाडूने जाणुबूजून केलं की चुकून झालं याचा निर्णय घेताना त्यांची अडचण होणार हे नक्की आहे. 

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यानेदेखील आयसीसीच्या नव्या नियमावर ताशेरे ओढले आहेत. संजय मांजरेकरने ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. संजय मांजरेकर यांनी लिहिलं आहे की, 'फेक फिल्डिंगसाठी पाच अतिरिक्त धावांचा दंड हा अत्यंत चुकीचा आणि हास्यास्पद नियम आहे. आयसीसीने यावर पुनर्विचार करावा'. 

यानंतर काही जणांनी संजय मांजरेकर यांना सल्ला देत खेळाडूंनी चीटिंग करु नये यासाठी नियम आणल्याचं सांगितलं. यावर उत्तर देताना संजय मांजरेकर यांनी धोनीचं उदाहरण दिलं. 'फेक फिल्डिंग ही चिटिंग नसून ट्रिक आहे. धोनीने चेंडू सोडला आणि तो स्टम्पवर जाऊन लागल्यामुळे रन आऊट झाला, तर दंड आकारण्यापेक्षा त्याचं कौतुक करा', असं संजय मांजरेकरने सांगितलं. 

असे आहेत नवे नियम - - एखाद्या खेळाडूने पंचांकडे फलंदाज पायचीत ( LBW ) असल्याचं अपील केलं, आणि पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवल्यानंतर निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेताना जर, अंपायर्स कॉल असा निर्णय आला तरीही ‘तो’ संघ आपली ( DRS ) ची संधी गमावणार नाहीये. याआधीच्या नियमांप्रमाणे तिसऱ्या पंचांनी अंपायर्स कॉल असा निर्णय दिल्यावर संघाची ( DRS ) ची संधी संपून जायची.- कसोटी सामन्यांत यापुढे एका डावात ८० षटकांनंतर DRS च्या दोन नवीन संधी मिळणार नाहीत. याआधी प्रत्येक संघाला ८० व्या षटकांनंतर दोन नवीन संधी मिळायच्या.- वन-डे आणि कसोटी सामन्याप्रमाणे टी-२० सामन्यातही DRS चा वापर करण्यात येणार आहे.- नवीन नियमांनूसार DRS मध्ये BALL TRACKING आणि EDGE DETECTION TECHNOLOGY या सुविधा असणं अनिवार्य होणार आहे.- आयसीसीच्या नवीन नियमांनूसार प्रत्येक फलंदाजाच्या बॅटची रुंदी ही १०८ मिमि, खोली ६७ मिमि तर बॅटची कडा ही ४० मिमि इतकी असणं बंधनकारक असणार आहे.- फुटबॉलच्या सामन्याप्रमाणे यापुढे कोणत्याही खेळाडूने मैदानात पंचांशी गैरवर्तन किंवा हुज्जत घातल्यास पंचांना त्यांना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार आहे.- नव्या नियमांनूसार एखाद्या फलंदाजाची बॅट क्रिजमध्ये पोहचल्यानंतर जर हवेत उचलली गेली तरीही त्याला धावबाद ( RUN OUT ) ठरवता येणार नाहीये. मात्र स्टम्प्स उडत असताना फलंदाजाची बॅट क्रिजमध्ये नसेल तर तो बाद ठरवला जाणार आहे.

टॅग्स :एम. एस. धोनीभारतीय क्रिकेट संघक्रिकेट