गयाना : आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सलग तीन विजयांची नोंद करून भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. भारताला शनिवारी गटातील अखेरच्या सामन्यात माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारताच्या गोटात चिंता निर्माण करणारी बातमी आली आहे. भारताची जलदगती गोलंदाज पूजा वस्त्राकरने दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे.
सराव सामन्यात पूजाला दुखापत झाली होती, परंतु तरीही तिचा संघात समावेश करण्यात आला होता. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत तिला एकदाही खेळवण्यात आले नाही, परंतु उपांत्य फेरीत तिला खेळवण्याची शक्यता होती. त्यामुळे तिच्या माघारीमुळे भारताला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.