प्रॉव्हिडेन्स(गयाना) : सलामीची फलंदाज मिताली राजने 47 चेंडूंत 56 धावांची खेळी केली आणि भारताला आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर 7 विकेट राखून विजय मिळवून दिला. मात्र, सामन्यानंतर बोलताना मितालीने हा ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप अखेरचा असल्याचे संकेत दिले.
ती म्हणाली,''भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधी ही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे कितीही वर्ष देशाची ब्लू जर्सी घालून खेळले, तरी ते कमीच वाटतं. मात्र, आता संघात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. या संघात अनेक युवा खेळाडू आहेत आणि संघ आता संतुलित झाला आहे. त्यामुळे हा वर्ल्डकप माझा अखेरचा असेल. ''
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मितालीने अर्धशतकी खेळी करताना रोहित शर्माला पिछाडीवर टाकले. तिने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत रोहितला मागे टाकले. मितालीने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 2232 धावा केल्या आहेत. मितालीच्या या फटकेबाजीसमोर कर्णधार विराट कोहलीही पिछाडीवर गेला आहे.