ठळक मुद्देभारतीय महिलांचा पाकिस्तानला दणकाट्वेटी-20 वर्ल्ड कपमध्ये दुसरा विजयमिताली राजची अर्धशतकी खेळी
प्रॉव्हिडेन्स(गयाना) : भारतीय संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकने दिलेल्या 133 धावांचे लक्ष्य भारताने 7 विकेट राखून पूर्ण केलं. भारताकडून मिताली राजने 47 चेंडूत 56 धावांची शानदार खेळी केली. तर स्मृती मनधानाने 28 चेंडूत 26 धावा केल्या. त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. भारतीय संघाने न्यूझीलंडपाठोपाठ पाकिस्तानलाही नमवून गटात आपले स्थान मजबूत केले आहे.
भारताची माजी कर्णधार आणि आघाडीची फलंदाज मितालीने अर्धशतकी खेळीबरोबरच भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्माला पिछाडीवर टाकले. तिने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत रोहितला मागे टाकले. मितालीने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 2232 धावा केल्या आहेत. मितालीच्या या फटकेबाजीसमोर कर्णधार विराट कोहलीही पिछाडीवर गेला आहे.
मितालीने 84 ट्वेंटी-20 सामन्यांत 16 अर्धशतकांसह 2232 धावा केल्या आहेत. तिने या आकडेवारीत कोहलीला आधीच पिछाडीवर टाकले आहे. कोहलीच्या नावावर 2102 धावा आहेत, तर रोहितच्या नावावर 87 सामन्यांत 2207 धावा आहेत.