ठळक मुद्देभारतासमोर उपांत्य फेरीत इंग्लंडचे आव्हान गतविजेते वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलियाशी भिडणार2017च्या पराभवाचा वचपा काढण्याची भारतीय महिलांना संधी
गयाना : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाचा चौकार खेचत ब गटात अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर कोणाचे आव्हान असणार हे गतविजेत्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर ठरणार होते. विंडीजने चार विकेट राखून इंग्लंडला नमवले आणि अ गटात अव्वल स्थान निश्चित केले. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आणि विंडीजसमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.
भारतीय महिला संघाची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जेतेपदाच्या अपेक्षा लागल्या आहेत. त्यात उपांत्य फेरीत इंग्लंडचा संघ समोर आल्यामुळे भारतीय चाहत्यांचा आनंद वाढला आहे. 2017 च्या वन डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंग्लंडने अटीतटीच्या सामन्यात भारताला पराभूत केले होते. त्या पराभवाचा सव्याज वचपा काढण्याची संधी भारतीय खेळाडूंसाठी चालून आली आहे.
भारतीय महिला संघाने ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना पराभूत करून विजयी घोडदौड कायम राखली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने २०१४ आणि २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत साखळी गटातील सर्व सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. तोच पराक्रम हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघाने केला. विश्वचषक आणि ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत सर्व सामने जिंकणारा हा तिसरा भारतीय संघ ठरला. यापूर्वी पुरुष संघाने साखळी गटात २०१४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत चार आणि २०१५ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत सहा सामने जिंकले होते.