ICC World Cup Qualifier : आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेचा बोलबाला दिसतोय... दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर आज त्यांनी अमेरिकेविरुद्ध ४०८ धावा केल्या. वन डे क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ गोंधळला अन् त्यांनी पटापट विकेट टाकल्या. झिम्बाब्वेने वन डे क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला.
जॉयलॉर्ड गुम्बी आणि इनोसेंट काइया ( ३२) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. जॉयलॉर्ड व कर्णधार सीन विलियम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी करताना अमेरिकेच्या गोलंदाजांना बेक्कार कुटले. जॉयलॉर्ड ७८ धावांवर माघारी परतल्यानंतर विलियम्स आणि फॉर्मात असलेल्या सिकंदर रझाची बॅट तळपली. रझाने २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा कुटल्या. रायन बर्लने १६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांची आतषबाजी केली. सीन द्विशतक झळकावेल असे वाटत होते, परंतु तो १०१ चेंडूंत २१ चौकार व ५ षटकारांसह १७४ धावांवर बाद झाला. झिम्बाब्वेने ६ बाद ४०८ धावा केल्या. वन डे क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यांनी भारताचा २०१४ सालचा ( ५/४०४ वि. श्रीलंका) विक्रम मोडला.