Join us  

ICC World Cup 2019 : भारत-पाक सामन्यावरील जाहिरातींवर सानिया मिर्झाचा 'घरचा अहेर'!

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत येत्या रविवारी भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकला नाही तरी चालेल, पण एकमेकांना हरवा; अशीच भावना या सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 12:25 PM

Open in App

हैदराबाद, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत येत्या रविवारी भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकला नाही तरी चालेल, पण एकमेकांना हरवा; अशीच भावना या दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये असते. त्याचाच उत्पादक कंपन्या फायदा उचलून वेगवेगळ्या जाहिराती तयार करत आहेत. पण, त्या जाहिराती करताना अनेकदा पातळी घसरलेली पाहायला मिळाली आहे. ताजं उदाहरण द्यायचं झाल्यास स्टार स्पोर्ट्स वाहीनीनं केलेली 'अब्बू' हा जाहिरात आणि त्याला पाकिस्तानकडून मिळालेल प्रत्युत्तर. त्यामुळे सोशल साईटवर वॉर सुरू झाला आहे. भारताची आघाडीची टेनिसपटू आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झानं या जाहिरातींवरून दोन्ही देशांतील चाहत्यांना घरचा अहेर दिला आहे.

येत्या रविवारी (16 जून) भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत. आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत सहावेळा दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. मात्र सर्वच्या सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. यानंतर आता 16 जूनच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या एका वाहिनीनं एक आक्षेपार्ह जाहिरात तयार केली. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती चहा पिताना दाखवण्यात आली आहे. पाकिस्ताननं पातळी सोडणारी जाहिरात तयार केली आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी हवाई दलासोबत झालेल्या चकमकीदरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर जाहिरातीत करण्यात आला आहे. यंदाचा वर्ल्ड कप आमचाच असेल, असा संदेश देणारी आक्षेपार्ह जाहिरात पाकिस्तानमधील वाहिनीनं तयार केली आहे.  

दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या जाहिरातींवर सानिया मिर्झा चांगलीच भडकली आहे. ती म्हणाली,''दोन्ही देशांमध्ये अशा द्वेश निर्माण करणाऱ्या जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या जाहिरातींची खरचं आवश्यकता नाही. मुर्खपणाचा बाजार मांडला आहे. हा केवळ क्रिकेट सामना आहे आणि त्याची दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये चांगली उत्सुकता आहे." 16 जूनला मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर ही लढत होणार आहे. पण, याही लढतीवर पावसाचं सावट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तानभारतपाकिस्तानसानिया मिर्झा