लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत मागील चार दिवसांत पावसामुळे तीन सामने रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ओढावली. सोमवारी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मंगळवारी श्रीलंका आणि बांगलादेश या सामन्यावरही पावसानं पाणी फिरवलं. याआधी 7 जूनला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक सामने रद्द होण्याचा विक्रम यंदा नोंदवला गेला आहे. त्यात आज होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड लढतीवरही पावसाचे सावट आहे.
आतापर्यंत कोणाला बसला सर्वाधिक फटका श्रीलंका - पावसाने सर्वाधिक नुकसान श्रीलंका संघाला पोहोचवलं आहे. चारपैकी दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांविरुद्धच्या लढती रद्द झाल्याने श्रीलंकेला एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यामुळे चार गुणांसह ते गुणतालिकेत सध्या पाचव्या स्थानावर आहेत. उर्वरित पाच सामन्यांतही त्यांना पावसाचा मारा सहन करावा लागणार आहे आणि अशा परिस्थितीत त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान डळमळीत झाले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील त्यांची शक्यता फार कमीच आहे.
दक्षिण आफ्रिका - वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच दक्षिण आफ्रिकेला तीन सलग पराभवाचा समाधान मानावा लागला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत त्यांचा प्रवेश अशक्यच दिसत आहे. त्यात वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना एक गुण मिळाला खरा, परंतु त्याचा त्यांना फार फायदा होईल असे वाटत नाही.