ICC World Cup 2019 : फलंदाजांचे अपयश श्रीलंकेला महागात पडणार, आफ्रिका विजय मिळवणार?
ICC World Cup 2019 : फलंदाजांचे अपयश श्रीलंकेला महागात पडणार, आफ्रिका विजय मिळवणार?
ICC World Cup 2019: यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 18:48 IST
ICC World Cup 2019 : फलंदाजांचे अपयश श्रीलंकेला महागात पडणार, आफ्रिका विजय मिळवणार?
चेस्टर-ले-स्ट्रीट, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यासाठी त्यांना उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची पंचायत झाली आहे. फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे श्रीलंकेला 203 धावाच करता आल्या. ख्रिस मॉरिस आणि ड्वेन प्रेटोरीस यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेला साजेशी सुरूवात करता आली नाही. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. कागिसो रबाडाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर लंकेला धक्का दिला. त्याने सलामीवीर व कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( 0) याला फॅफ ड्यू प्लेसिसकरवी झेलबाद केले.
करुणारत्ने शून्यावर बाद होऊनही एक पराक्रम करून गेला. रबाडाने टाकलेल्या चेंडूच्या वेगाचा अंदाज बांधण्यात अपयशी ठरलेल्या करुणारत्नेने पहिल्याच चेंडूवर विकेट टाकली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. शिवाय गोल्डन डक नावावर करणारा पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी आशियातील एकाही कर्णधारावर अशी नामुष्की ओढावलेली नाही.
त्यानंतर कुशल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण, वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना खेळणाऱ्या ड्वेन प्रेटोरीसने लंकेला धक्के दिले. अँजेलो मॅथ्यूजने तिसऱ्या विकेटसाठी परेरासह काही काळ संघर्ष केला, परंतु त्यालाही स्वस्तात माघारी पाठवण्यात आफ्रिकेला यश आले. कुशल मेंडीसही लवकर बाद झाला. प्रोटरीसने 10 षटकांत 25 धावांत तीन फलंदाज बाद केले. त्यानंतर लंकेला धक्का देण्याचे सत्र आफ्रिकेने कायम राखले. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. परेरा ( 30), फर्नांडो ( 30), मेंडीस ( 23) व डीसिल्वा ( 24) यांनी छोटेखानी खेळी केली. पण, त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.