लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान संघाने विजयी निरोप घेतला. पाकिस्तानने अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशवर 94 धावांनी विजय मिळवला. शाहिन आफ्रिदीने 35 धावांत 6 विकेट घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा तो युवा गोलंदाज ठरला. पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या 316 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 221 धावांत तंबूत परतला. या सामन्यानंतर पाकिस्तान संघाचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. मलिक हा सध्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेत 1990च्या दशकातील सक्रिय असलेला एकमेव आशियाई खेळाडू होता.
![]()
तो म्हणाला,''आज मी आतंरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. ज्यांच्यासोबत मी इतकी वर्ष खेळलो त्या खेळाडूंचा, कर्णधारांचा आणि प्रशिक्षकांचे आभार.'' यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत 90च्या दशकातील मलिक हा एकमेव आशियाई खेळाडू खेळत होता. भारताच्या हरभजन सिंगनेही 90च्या दशकात पदार्पण केले होते, परंतु तो भारतीय संघाचा सदस्य नाही.
ख्रिस गेल हा 90च्या दशकातील सक्रीय असलेला एकमेव खेळाडू आहे. मलिकनं 287 वन डे सामन्यांत 34.55च्या सरासरीनं 7534 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघातील सर्वाधिक धावा करणारा तो पाचवा खेळाडू आहे. शिवाय पाकिस्तानी फिरकीपटूंमध्येही सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये तो पाचवा आहे. पाकिस्तान संघात क्रमांक 1 ते 10 येथे त्याने फलंदाजी केली आहे.
शोएबनं दिला पाक संघाला सल्ला
पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी कोणाचीही निवड केल्यास, किमान त्याला दोन वर्षांचा वेळ द्या, असा सल्ला मलिकनं दिला.