मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑसीविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला ही दुखापत झाली होती. मंगळवारी त्याच्या या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल आला आणि त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्याचे समोर आले. त्यामुळे बांगलादेश ( 2 जुलै) किंवा श्रीलंका ( 6 जुलै) यांच्याविरुद्ध सामन्यापर्यंत धवन खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, याची शक्यता कमीच आहे. या दुखापतीमुळे खचून न जाता धवननं पुन्हा गगन भरारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक भावनिक कविता पोस्ट केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता.