लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीसह सहभागी संघांच्या कर्णधारांनी इंग्लंडची राणी एलिजावेथची भेट घेतली. यावेळी सर्व संघांचे कर्णधार सुटा-बुटात आले होते, परंतु पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद सलवार कमीजमध्ये दिसला. संपूर्ण दिवसभर सर्फराजच्या पेहेरावचीच चर्चा रंगली. वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघातील कर्णधारांना इंग्लंडच्या राणीने आमंत्रित केले होते.
सर्व कर्णधारांना सूट-बूट घालण्याचे आदेश होते, परंतु पाक कर्णधाराने सलवार कमीज परिधान केले. त्याबाबत सर्फराज म्हणाला,''सलवार कमीज हा आमचा राष्ट्रीय पेहेराव आहे आणि मला पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून तो परिधान करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय पेहेरावचा प्रसार करण्याचा मी प्रयत्न केला. अन्य कर्णधार सुटा-बुटात होते आणि मी राष्ट्रीय पेहेराव परिधान केला होता. याचा मला अभिमान वाटत होता.''
स्पॉट फिक्सिंगच्या निलंबनामुळे 2011 व 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर राहिल्यानंतर आपला पहिला विश्वचषक स्पर्धा खेळत असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर आक्रमक फलंदाज ख्रिस गेल व फॉर्मात असलेल्या शाय होपचा समावेश असलेल्या विंडीजच्या आघाडीच्या फळीला रोखण्यात यशस्वी ठरेल, अशी सर्फराजला आशा आहे.
पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या सलामी लढतीत आज
वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या चमकदार कामगिरीपासून प्रेरणा घेत पाक संघ वर्ल्ड कपमध्ये धडाक्यात सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असतील. पाकिस्तान संघाला मागील 10 वन डे सामन्यांत विजय मिळवण्यात अपयश आले आहे. सराव सामन्यातही त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. पण, हे अपयश मागे सोडून नव्या दमाने वर्ल्ड कप स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी पाक संघ सज्ज झाला आहे. विंडीजविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानने त्यांचे अंतिम 12 शिलेदार जाहीर केले आहे.
पाकिस्तानचे BEST 12
फाखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, मोहम्मद हाफिज, सर्फराज अहमद, हॅरीस सोहैल, आसीफ अली, शाबाद खान, इमाद वासीम, मोहम्मद आमीर, वाहब रियाज, हसन अली.