लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. हाशिम अमलाच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या एडन मार्कराम आणि क्विंटन डी'कॉक यांनी चांगला खेळ केला. पण, दहाव्या षटकात ताळमेळ जमलेल्या जोडीचं फिसकटलं आणि हो-नाय च्या चक्करमध्ये पाच सेकंदात डी'कॉकला माघारी परतावे लागले. मुशफिकर रहिमने त्याला धावबाद केले. त्यानंतर मार्करामने कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसच्या सोबत संघाचा डाव सावरला. पण, शकिब अल हसनने त्यालाही माघारी पाठवले आणि विक्रमाला गवसणी घातली.
दक्षिण आफ्रिकेने दिलेले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत
बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांच्या दमदार सलामीनंतर अनुभवी शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर अन्य फलंदाजांनी हातभार लावत बांगलादेशला 6 बाद 330 धावांचा पल्ला गाठून दिला. वन डे क्रिकेटमधील बांगलादेशची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.
वन डे क्रिकेटमधील शकिबचा तो 250वा बळी ठरला. पण, त्याचबरोबर शकिबने सनथ जयसूर्या, शाहिद आफ्रिदी, जॅक कॅलिस आणि अब्दुल रझाक यांच्या पंक्तिक स्थान पटकावले, वन डे क्रिकेटमध्ये 250 विकेट्स आणि 5000 धावा करणारा तो पाचवा अष्टपैलू खेळाडू ठरला. त्याने 199 सामन्यांत हा पराक्रम केला आणि ही अष्टपैलू खेळाडूची सर्वात जलद कामगिरी आहे. शिवाय बांगलादेशकडून 250 विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे.