Join us

ICC World Cup 2019 : धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय माझा एकट्याचा नव्हता, बांगर 

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज झटपट माघारी परतले असतानाही अनुभवी महेंद्रसिंग धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 15:19 IST

Open in App

मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज झटपट माघारी परतले असतानाही अनुभवी महेंद्रसिंग धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवले. त्यावरून बरीच टीका झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस रंगलेला हा सामना भारतीय संघाला गमवावा लागला. पण, धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय हा संपूर्ण संघाचा होता, माझ्या एकट्याचा नाही, असा खुलासा भारतीय संघाचे फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांनी केला.

वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडने 50 षटकांत 8 बाद 239 धावा केल्या. केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर किवींनी हा पल्ला गाठला. त्यानंतर मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी भारताचे तीन फलंदाज अवघ्या 5 धावांत तंबूत पाठवले. त्यानंतर रवींद्र जडेजा ( 77) आणि धोनी ( 50) यांनी सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करताना संघाला विजयासमीप आणले. पण, भारताला 18 धावांनी हा सामना गमवावा लागला.

या संपूर्ण स्पर्धेत धोनीनं पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली, परंतु उपांत्य फेरीत त्याला सातव्या क्रमांकावर पाठवण्यात आले. त्यामुळे बांगर यांच्यावर टीका झाली होती. बांगर म्हणाले,''त्या पराभवानंतर लोकं माझ्याकडे संशयाच्या नजरेनं पाहत असल्याचे समजताच मला आश्चर्य वाटले. पण, हा माझा एकट्याचा निर्णय नव्हता. तो संघाने घेतलेला निर्णय होता. विराट कोहलीनंही अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीला आणखी खालच्या क्रमांकाववर खेळवणार असल्याचे संकेत दिले होते. जेणेकरून त्याला 35 षटकानंतर मोठी खेळी खेळता येईल. तळाच्या क्रमवारीत धोनीसारखा अनुभवी फलंदाज असणे गरजेचे होते. त्यामुळे उपांत्या फेरीत त्याला सातव्या क्रमांकावर पाठवले.'' 

''त्या सामन्यात दिनेश कार्तिकला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. रवी शास्त्रींनीही तो संघाचा निर्णय असल्याचे सांगितले होते. त्यामुळे धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय हा माझा एकट्याचा होता, अशी चर्चा का होत आहे, ते समजण्यापलीकडे आहे,'' असेही बांगरने सांगितले. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019महेंद्रसिंग धोनी