- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)
शिखर धवनची दुखापत भारतीय संघासाठी धक्का होता. मात्र राहुलने सलामीवीराची भूमिका बजावत संघात शिखर याची उणीव फारशी जाणवू दिली नाही. रोहित आणि राहुल यांनी पाकिस्तानविरुद्ध जबाबदारीने खेळ केला. राहुल गेल्या काही काळापासून संघासोबत आहे, त्यामुळे रोहित आणि राहुल यांच्यातही चांगला ताळमेळ आहे.
ॠषभ पंतला विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळायला हवे होते; मात्र आता त्याला नशिबाने संधी मिळाली आहे. पंतला अंतिम ११ मध्ये संधी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता तर विजय शंकर यालाही दुखापत झाली आहे. जर शनिवारच्या सामन्यात विजय शंकरला विश्रांती देण्यात आली, तर पंतला संधी मिळू शकते. एक फलंदाज म्हणून त्याला संघात घेतले जाऊ शकते.
अव्वल चारही संघ मजबूत आहेत. या चारही संघाचा खेळ उत्तम आहे. मात्र बांगलादेश उपांत्य फेरीच्या शर्यतीतील पाचवा संघ आहे. बांगलादेशचा भारताविरुद्धचा सामना जुलैमध्ये आहे. त्यात भारतीय संघ व्यवस्थापन बांगलादेश संघाला सहजतेने नक्कीच घेणार नाही. गुरुवारीही बांगलादेशने गतविजेत्या आॅस्ट्रेलियाला चांगली झुंज दिली. त्यांच्याकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीतही बांगलादेश समतोल संघ आहे. सौम्य सरकार, महमुदुल्लाह, तमीम इक्बाल यासारखे फलंदाज शकीब उल हसन सारखा अष्टपैलू खेळाडू आणि मुस्तफिजूर रहमानसारखा गोलंदाजही आहे.