Join us  

ICC World Cup 2019 : मल्टिटॅलेंटेड केदार जाधव ठरणार का हुकमी एक्का?

ICC World Cup 2019: धडाकेबाज फलंदाज, उपयोगी फिरकीपटू आणि चपळ क्षेत्ररक्षक असलेला केदार संघाला गरज असल्यास यष्टीरक्षणदेखील करू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 9:59 AM

Open in App

पुणे : इतर खेळाडूंच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय कारकीर्द उशिरा सुरू झाली असली तरी गुणवत्तेच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करीत पुण्याचा धडाकेबाज अष्टपैलू केदार जाधव याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले आहे. याबाबत तमाम पुणेकरांमध्ये त्याच्याबाबत कौतुकाची भावना आहे. धडाकेबाज फलंदाज, उपयोगी फिरकीपटू आणि चपळ क्षेत्ररक्षक असलेला केदार संघाला गरज असल्यास यष्टीरक्षणदेखील करू शकतो. त्याच्या या मल्टिटॅलेंटमुळे संघ व्यवस्थापनाला अनेक प्रयोग करण्यासाठी मोकळीक मिळणार आहे. ३४ वर्षीय केदारने नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या एकदिवसीय लढतीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी तो २९ वर्षांचा होता. प्रारंभी संघात स्थिरावण्यास त्याला थोडा वेळ लागला. मात्र अल्पावधीतच त्याने स्वत:ला सिद्ध केले. दुखापतींनी त्याचा पिच्छा पुरविला मात्र, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने आपला फिटनेस सिद्ध केला आणि विश्वचषकासाठी संघात स्थान पटकावले.

परफेक्ट कॉम्बिनेशन!विश्वचषक जिंकण्यासाठी आदर्श असे कॉम्बिनेशन या संघनिवडीच्या निमित्ताने पुढे आले आहे. विराट कोहली कर्णधारपदाचा दबाव न घेता मोकळेपणाने अत्युच्च दर्जाची फलंदाजी करीत आहे. त्याला धोनी मिळालेली साथ ही या संघनिवडीतील सर्वोत्तम गोष्ट. फलंदाजीत आपण दादा आहोत. इंग्लंडमध्ये स्विंग गोलंदाजीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शमी आणि भुवी हे स्विंग स्पेशालिस्ट अतिशय उपायोगी ठरतील. नवोदित अष्टपैलू विजय शंकरकडेही चेंडू स्ंिवंग करण्याची क्षमता आहे. बुमराहचे वेगातील वैविध्य आणि यॉर्कर यांचा जगभरातील फलंदाजांनी धसका घेतलाय. कुलदीप आणि चहल ही फिरकी जोडी प्रभावी आहे. शंकरसह हार्दिक पांड्या, केदार जाधव, जडेजा ही अष्टपैलू चौकडी संघाची ताकद म्हणून पुढे येऊ शकतात. एकंदरीत, हा संघ म्हणजे, तिसऱ्यांदा वन-डे क्रिकेटचे विश्वविजेतेपद साकारण्यासाठी परफे क्ट कॉम्बिनेशन आहे.- सदानंद मोहोळ, माजी वेगवान गोलंदाज

प्रबळ आत्मविश्वास हा केदारचा यूएसपीकेदार जाधव हा आत्मविश्वासाने परिपूर्ण खेळाडू आहे. उशीरा संधी मिळाली असली ती स्वत:वरील आत्मविश्वास कायम ठवल्याने तो विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकला. मैदानावर फलंदाजीला उतरल्यावर त्याची देहबोली कमालीची सकारात्मक असते. जणू काही ७० धावांवर नाबाद असल्याच्या आत्मविश्वासाने तो आपल्या खेळीला प्रारंभ करतो. केदार कायम नैसर्गिक खेळ करण्याला प्राधान्य देत आलाय. पण अनेकदा आपली विकेट त्याने गोलंदाजांना बहाल केली. मात्र, आता त्याला आपल्या विकेटचे मोल कळले आहे. सध्या तो सहजासहजी विकेट फेकत नाही. ही त्याने स्वत:मध्ये केलेली मोठी सुधारणा मानावी लागेल. यामुळे विश्वचषकात त्याचा खेळ नवी उंची गाठेल, याचा विश्वास मला आहे.- रियाझ बागवान, सचिव, महाराष्ट्र क्रिकेट संघटना

विजय शंकरचा रोल महत्वाचा ठरू शकतोअनेकांना विजय शंकरची निवड अनपेक्षित वाटत असली तरी, एक खेळाडू म्हणून माझ्या दृष्टीने विश्वचषक स्पर्धेत त्याची भूमिका महत्वाची ठरू शकते. आॅस्ट्रेलियाविरूद्ध दबावाखाली केलेली कामगिरी त्याच्या क्षमतेची चुणूक दाखविणारी होती. फलंदाजीसह इंग्लंडमधील स्विंगला पोषक वातावरणात त्याच्या गोलंदाजीचा लाभ संघाला नक्कीच होईल. त्यामुळे संघाला प्रयोग करणे सोपे होईल. आपल्या पुण्याचा केदार विश्वचषकात खेळणार, ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. फलंदाजीत त्याच्याकडून अपेक्षा आहेतच. माझ्या मते, गोलंदाजीतील युनिकनेस त्याची स्ट्रेंंग्थ आहे. बाकी आपला संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सरस आहे.- तेजल हसबनीस, महाराष्ट्राच्या महिला संघातील अष्टपैलू खेळाडू

प्रतिकूल परिस्थितीने केदारला परिपक्व बनविले...केदार अनेकदा मैदानावर प्रतिकूल परिस्थिती असताना संघाच्या मदतीला धावून आला आहे. किशोरवयीन गटापासून त्याचे हे वैशिष्ट्ये राहिले आहे. यामुळेच केदार हा परिपक्व क्रिकेटपटू बनला. तो कायम संघाला सामना जिंकून देण्याच्या प्रयत्नात असतो. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला करायला त्याला आवडते. एमईएस क्लबचा एक सहकारी म्हणून त्याच्या यशाचा आम्हाला अभिमान वाटतो.- दत्तात्रय वाळके, प्रशिक्षक 

कोहलीला धोनीचे सहकार्य उपयुक्त ठरेलकेदारचे हे यश सहज मिळालेले नाही २-३ वर्षांत त्याने कठोर मेहनत घेतल्याने त्याला विश्वचषकात संधी मिळाली आहे. उमेदीच्या काळात पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सर्वच स्पर्धा गंभीरपणे खेळला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना वारंवार दुखापती झाल्यावर केदारने फिटनेसकडे गांभिर्याने लक्ष देत यावर विजय मिळविला. विश्वचषकात कर्णधार कोहलीला धोनीचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल. आपल्याला किमान उपांत्य फेरी गाठण्याची संधी नक्कीच आहे.- अरविंद शिंदे, अध्यक्ष पुणे जिल्हा क्रिकेट संघ

केदारला पाचव्या-सहाव्या क्रमांकावर धुमशान करताना बघण्यास उत्सुकयंदा फलंदाजीबरोबरच गोलंदाजी हे आपले बलस्थान आहे. इंग्लंडमधील वातावरणात आपले मध्यमगती गोलंदाज अतिशय प्रभावी ठरतील, असे मला वाटते. हार्दिक पंड्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी मिळाल्याने गोलंदाजी अधिक बळकट झाली आहे. विश्वचषकात स्थान मिळण्यासाठी केदार सर्वार्थाने दावेदार होता. आतापर्यंतची कामगिरी ही त्याची क्षमता सिद्ध करणारी आहे. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर केदार हा नैसर्गिकपणे फलंदाजी करतो. समोर गोलंदाज कोण आहे, याचा विचार तो कधीच करीत नाही. विश्वचषकात पाचव्या-सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन आपल्या घडाकेबाज खेळीद्वारे धुमाकुळ घालणारा केदार आपणा सर्वांना बघायला मिळेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही.- हर्षद खडीवाले, रणजीपटू

केदारला प्रतिबद्धतेचे फळ मिळाले..केदार हा आपल्या खेळाप्रती प्रतिबद्ध आहे. एकदा पीवायसीचा संघ एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. नेमका त्याचवेळी केदार कुठल्या तरी दौऱ्यावरून परतला होता. त्याला बरे नव्हते. तरीही तो स्वत:हून फायनल खेळायला आला होता. या सामन्यात त्यांनी ७० पेक्षा जास्त धावा आणि ३ बळी अशी कामगिरी करीत पीवायसीला विजेतेपद मिळवून दिले. विश्वचषकात ही तो आपली छाप पाडेल याबाबत आमच्या मनात शंका नाही.- रणजित पांडे, प्रशिक्षक पीवायसी हिंदू जिमखाना

टॅग्स :केदार जाधववर्ल्ड कप २०१९आयसीसी